मुंबई - युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील भगवंत रक्तपेढीतर्फे मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाला २५० रक्ताच्या बाटल्या व २५० व्हिटॅमिन डी-थ्री इंजेक्शनची मदत करण्यात आली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते रक्त आणि इंजेक्शन नायर रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील भगवंत रक्तपेढीतर्फे प्राप्त झालेल्या २५० रक्ताच्या बाटल्या तसेच व्हिटॅमिन डी- थ्री चे अडीचशे इंजेक्शन्स मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते आज नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर म्हणाल्या की, भगवंत रक्तपेढीचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. त्यांनी कोरोना रुग्णांची खास व्यवस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाला ही भेट दिली आहे. नायर रुग्णालयाचे डॉक्टर सुद्धा कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र झटत असून आपण सर्वांनी मिळून त्यांना साथ देऊया, असे महापौर म्हणाल्या. याप्रसंगी युवासेना कायदा विभागाचे प्रमुख अॅड. धरम मिश्रा, सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात, बार्शीच्या भगवंत रक्तपेढीचे प्रमुख शशिकांत जगदाळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
मुंबई महापालिकेची केईएम, नायर, सायन, ट्रॉमा केअर, कूपर ही मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयात गंभीर स्वरुपाच्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या रुग्णालयात वेळोवेळी रक्ताची आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे, इंजेक्शन यांची गरज भासते. रक्त, औषधे आणि इंजेक्शन देणाऱ्या अनेक संस्था तसेच दानशूर पुढे येत असल्याने पालिका रुग्णालयातील रुग्णांना वेळेवर रक्त, औषधे आणि इंजेक्शन मिळत आहेत.