मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा आल्या आणि त्यावर पालिकेने नियंत्रण मिळवले आहे. असे असताना तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज झाली असून झोपडपट्टीवर लक्ष केंद्रित केले आहे. धारावी परीसरातील पोलिओ लसिकरणाची माहिती पालिकेकडून संकलन केली जाते आहे. या माहितीच्या आधारे प्रत्येक घरातील बालकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच बालरोग तज्ञांची मदतही घेतली जाणार आहे.
बालकांवर विशेष लक्ष -
कोरोनाच्या दुस-या लाटेत मुंबईत झपाट्याने रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा भासला. ऑक्सिजन अभावी काही रुग्णांनाही इतर रुग्णालयात हलवावे लागले होते. पालिकेच्या प्रभावी उपायय़ोजनांमुळे दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले. मात्र आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना जास्त असण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिव रुग्णालयाच्या धारावी उपकेंद्रात खास मुलांसाठी स्वतंत्र विभाग तयार केला जात आहे. यात बालकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच पोलिओ लसिकरणातून महानगर पालिकेकडे प्रत्येक घरातील बालकाची माहिती उपलब्ध असते. या माहितीच्या आधारे बालकांची माहिती मिळणार असून त्याचा उपयोगही करण्यात येणार असल्याचे जी - उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
पालिका लागली कामाला -
पोलिओ लसीकरणामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रत्येक घरातील बालकाची माहिती आहे. त्यामुळे या प्रत्येक बालकावर लक्ष ठेवणेही शक्य असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक घरात जाऊन लहान मुलांची विचारपूस करणेही शक्य आहे. पोलिओ लसीकरणासाठी पालिकेच्या आरोग्य सेविका ठराविक दिवशी लसिकरण केंद्र सुरु करतात. तसेच या दिवशी त्यांच्या यादीतील बालक लस घेण्यासाठी न आल्यास आरोग्य सेविका त्यांच्या घरी जाऊनही लस पाजतात. या आरोग्य सेविकांना प्रत्येक घराची माहिती असते. त्यामुळे त्याचाही फायदा बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेची तयारी सुरु आहे. दुसऱ्या लाटेत खाटा, ऑक्सिजनचा तुटवडा भासला होता. त्यामुळे तिस-या लाटेत पुरेसा सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पालिका कामाला लागली असल्याचे सांगण्यात आले.
बालरोग तज्ज्ञांची घेणार मदत -
बालकांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक बालरोग तज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे. कोविड विरोधातील मोहिमेत धारावी परिसरातील खासगी डॉक्टरांनी पालिकेला चांगले सहकार्य केले आहे. आताही स्थानिक बालरोग तज्ज्ञांची मदत घेऊन लहान मुलांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही सहाय्य़क आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.