मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. मात्र, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे लॉकडाऊनच्या काळात नोव्हेंबरअखेरपर्यंत राज्यात एकुण १ लाख ३२ हजार ३०८ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. अशी माहिती कौशल्य विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
दरम्यान फक्त नोव्हेंबर महिन्यात १६ हजार ३८० बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान एकूण १ लाख ६४ हजार ७२३ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशे मंत्री नवाब मलिक म्हणाले. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.
नोव्हेंबरमध्ये विभागाकडे ३५ हजार २१४ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १३ हजार २८४, नाशिक विभागात ४ हजार ०४६, पुणे विभागात ९ हजार २११, औरंगाबाद विभागात ६ हजार २३, अमरावती विभागात १ हजार ४२३ तर नागपूर विभागात १ हजार २२७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
नोव्हेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १६ हजार ३८० उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ९ हजार ९२३, नाशिक विभागात १ हजार १४१, पुणे विभागात ४ हजार ६८, औरंगाबाद विभागात ७७२, अमरावती विभागात ३२१ तर नागपूर विभागात १५५ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.
नोंदणीसाठी 20 तारखेपर्यंत मुदतवाढ -
राज्यात नुकत्याच १२ आणि १३ डिसेंबर रोजी झालेल्या झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्यास उमेदवार व उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने या मेळाव्याचा कार्यक्रम आता २० डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आला असल्याची घोषणा मंत्री नवाब मलिक यांनी केली. बेरोजगार तरुण व उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.
सोशल मीडियावर मुलाखती -
व्हॉटस्ॲप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.