मुंबई - दादरा नगर हवेलीचे माजी खासदार डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी नेमून चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने गदारोळ सुरूच ठेवला. त्यामुळे परिषदेचे कामकाज सकाळपासून तीन वेळा तहकूब करण्यात आले.
हे ही वाचा - मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपच्या प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे आहेत. डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी नरिमन पॉईंट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार दादर नगर हवेलीतील प्रत्येकाची एसआयटी नेमून एटीएसमार्फत चौकशी करून कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
हे ही वाचा - रवी पुजारीची पोलीस कोठडी 15 मार्चपर्यंत वाढविली
परिषदेचे कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब -
गृहमंत्री यांच्या उत्तराने समाधान झाले नसल्याचे सांगत विरोधकांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घातला. गोंधळात सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र सचिन वाजे याच्या निलंबनाच्या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने परिषदेचे कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब कारण्यात आले आहे.