मुंबई: जिल्हा मध्यवर्ती बँकेत मजुर या प्रवर्गातून प्रवीण दरेकर निवडून आल्याने त्यांच्यावर आप पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत सहकार विभागातून चौकशी सुरु होती. आता सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे. याबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे की मला अपात्र ठरवले असले तरीसुद्धा याबाबत डीडीआरला सूचना दिलेल्या आहेत.
त्यांचा अहवाल आल्यानंतर या विषयी मी उच्च न्यायालयात दाद मागणार असून याठिकाणी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम काही लोक करत आहेत. हे माझ्या विरोधामध्ये षडयंत्र रचले जात असून याविषयी तक्रार करणारी व्यक्ती विविध अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, मंत्र्यांच्या कार्यालयात, सीएमओ कार्यालयात जाते त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. शेवटी चौकशी केल्यानंतर व्यक्तिगत द्वेषातून हे केलं जात आहे हे मी जनतेसमोर आणणार असेही त्यांनी म्हटले आहे.
राजीनामा द्यायचा प्रश्न नाही!
२ जानेवारीला झालेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर यांनी मजूर संस्थेच्या प्रवर्गातून त्याचप्रमाणे नागरी सहकारी संस्थांच्या गटातून ही निवडणूक लढवली होती. व या दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला होता. परंतु आता त्यांनी मजूर संस्थेच्या प्रवर्गातून निवडून आलेल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले आहेत. मजुरांनी श्रीमंत होऊ नये का? एकेकाळी धीरूभाई अंबानी सुद्धा ओझी वाहण्याचे काम करायचे व आज देशात त्यांचे कुटुंब हे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे असेही ते म्हणाले.
हेही वाचा : Padalkar Vs Awhad: आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार...गोपीचंद पडळकर