मुंबई - गेल्या काही काळापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे पुन्हा खुली करावीत या मागणीसाठी भाजपा व मनसेने नुकतेच राज्यभरात शंखनाद आंदोलन केले होते. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांवर निशाणा साधला आहे. मंदिरे बंद असली तरी कोरोनाकाळात आरोग्य मंदिरे सुरू आहेत. ही आरोग्य मंदिरे हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत. त्यामुळे जनता आपल्याला आशीर्वाद देईल, असे म्हणत भाजपला टोला लगावला आहे.
हे ही वाचा - नवीनच गोष्ट...माझ्याही ज्ञानात भर पडली, शरद पवारांचा मोहन भागवत यांना खोचक टोला
कोरोनाचा धोका संपलेला नाही. प्रत्येकाने यावेळी आपली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडणार आहोतच. त्याचबरोबरच आरोग्य मंदिरे देखील आवश्यक आहेत. ही आरोग्य मंदिरे उघडल्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. डोंबिवलीतील कोपर पुलाच्या लोकार्पणासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, रविंद्र फाटक आदी उपस्थित होते. तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे ऑनलाइन उपस्थित होते.
हे ही वाचा - मुखेड तालुक्यात कारसह पितापुत्र गेले वाहून; पाहा व्हिडिओ
अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद मोडून काढावा लागेल -
ठाण्यातील सहाय्यक आयुक्तांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या दुर्देवी घटनेनंतर अधिक कठोरतेने कायद्याची अंमलबजावणी करावी लागणार आहेत. स्काय वॉक हे फेरीवाले मुक्तच असले पाहिजेत. यासाठी कायद्याचे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. अनधिकृत फेरीवाल्यांकडून केला जाणारा उच्छाद मोडून काढावा लागेल असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. दया क्षमा दाखवून चालणार नाही. सामान्य नागरिक तसेच अधिकार यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. .