मुंबई - मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु ( Mumbai vaccination Update ) आहे. या लसीकरण मोहिमे दरम्यान आतापर्यंत मुंबईमधील ९८ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र बूस्टर डोसला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले ( Short response to Booster Dose in Mumbai ) आहे. हेल्थ केअर वर्कस, फ्रंट लाईन वर्कस व जेष्ठ नागरिकांनी मागील पावणे दोन महिन्यांत ३ लाख ४२ हजार लाभार्थ्यांनी बूस्टर डोस ( Booster Dose in Mumbai ) घेतला आहे.
९८ टक्के लाभार्थ्यांना दोन्ही डोस -
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कस, फ्रंट लाईन वर्कस त्यानंतर जेष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर १८ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. १६ जानेवारी २०२१ ते ३ मार्च २०२२ पर्यंत पहिला डोस ११८ टक्के तर दुसरा डोस ९८ टक्के जणांनी घेतला आहे. १५ ते १८ वयोगटापर्यंतच्या ६० टक्के मुलांनी पहिला व ३४ टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
३ लाख ४२ हजार लाभार्थ्यांना बूस्टर डोस -
मुंबईसह देशभरात कोरोनाची तिसरी लाट आल्याने कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या हेल्थकेअर वर्कर फ्रंट लाईन वर्कस व ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर १० जानेवारी २०२२ पासून बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. बूस्टर डोसचे सुमारे १३ लाख लाभार्थी असून गेल्या दोन महिन्यांत ३ लाख ४२ हजार लाभार्थ्यांनीच डोस घेतला आहे. त्यामुळे बूस्टर डोस मोहिमेला अजूनही हवा तेवढा प्रतिसाद मिळालेला नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.