मुंबई - रत्नागिरी- सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते पदी वर्णी लागली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संसदीय कार्यमंत्र्यांना याविषयी पत्र दिले आहे.
खासदार विनायक राऊत हे कोकणातील शिवसेनेचे मोठे नेते आहेत. माजी केंद्रिय मंत्री अनंत गीते यांचा रायगडमध्ये पराभव झाल्याने लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते पदाची माळ राऊत यांच्या गळ्यात पडली असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेकडून मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रीपदावरून शिवसेनेच्या खासदारांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले होते. मंत्रीपदाची अपेक्षा असल्याने एका खासदाराने गटनेते पद नाकारले होते. मात्र, हे नाव कोणते होते हे मात्र समजू शकले नाही. आता विनायक राऊत यांची निवड करण्यात आली आहे.