मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई आणि महाराष्ट्राविरुद्ध केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली. कंगनाने एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके) केली होती.
कंगनाने केलेल्या ट्विटविषयी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपण माफी मागणार का, असे राऊत यांना पत्रकारांनी विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना राऊन यांनी कंगनानेच माफी मागितली पाहिजे, असे म्हटले आहे. 'जे कोणी येथे राहत आहेत आणि काम करत आहेत, तरीही मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी लोकांबद्दल वाईट बोलत आहेत, त्यांनी आधी माफी मागावी, असे मी म्हणेन,' असे राऊत म्हणाले.
एका ट्विटमध्ये कंगनाने अलीकडेच विचारले होते की, 'मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी (पीओके) का वाटत आहे?' या ट्विटमध्ये तिने 1 सप्टेंबरला आलेले एक वृत्तही टॅग केले होते. 'कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर, तिने परत मुंबईत येऊ नये,' असा सल्ला राऊत यांनी दिल्याचे हे वृत्त होते. त्याविषयी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केली होती.
शहर पोलिसांना बदनाम करणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करावी, असे आवाहन राऊत यांनी राज्य सरकारला शुक्रवारी केले होते. तसेच, त्यांनी कंगनालाही प्रथम पीओकेला जाऊन तेथील परिस्थिती पहाण्यास सांगितले होते. कंगना सध्या तिचे मूळ राज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात आहे. तिने आपण 9 सप्टेंबरला मुंबईला परत येणार असल्याचे सांगून आपल्याला अडवण्याची हिंमत करून दाखवावी, असे आव्हान दिले आहे.