मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(MNS Chief Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अनेक महिन्यानंतर या दोन्ही बड्या नेत्यांची भेट झाली आहे. मात्र, ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांच्या मुलीचे लग्न आहे. याचे निमंत्रण देण्यासाठी राऊत शिवतीर्थावर(Shivtirth) गेले होते.
- मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी राऊत राज ठाकरेंच्या घरी -
संजय राऊत यांच्या मुलीचं 29 नोव्हेंबरला लग्न आहे. यासाठी राऊत कुटुंबीय लग्न पत्रिका वाटत आहेत. लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी संजय राऊत सपत्नीक राज यांच्या घरी पोहचले होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर प्रथमच राऊत राज यांच्या निवासस्थानी गेले होते. दोघांमध्ये अर्धा तासापेक्षा जास्त चर्चा झाली असल्याची माहितीही समोर आली आहे. मुलीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देऊन संजय राऊत निघाले तेव्हा राज ठाकरे स्वत: त्यांना दरवाजापर्यंत सोडायला आले होते. शर्मिला ठाकरे व राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते.
- राजकारणाच्या पलीकडची मैत्री -
राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या जुन्या कृष्णकुंज या निवासस्थानातून बाजूला असणाऱ्या नव्या शिवतीर्थ या निवासस्थानी राहायला आले आहेत. राऊत आणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. ते जुने मित्र आहेत. त्यांच्यात राजकारणाच्या पलीकडचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत हे आजच्या भेटीवरून दिसून आले आहे.
- शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन होता. त्यामुळे संजय राऊत आज शिवतीर्थावर सपत्नीक आले होते. शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केल्यानंतर राऊत यांनी थेट राज ठाकरे यांचे नवे घर गाठले. राऊत यांनी राज यांची भेट घेतली.