मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या भेटीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी '2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणात काहीतरी घडतं अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले, के सी राव आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाजपाचे काही नेते टीका करत आहे. या भेटीतून राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची मांडणी होत आहे. त्यामुळेच विरोधक या भेटीची खिल्ली उडवत आहेत. हा केवळ मुख्यमंत्र्यांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा लोकांना जनता 2024 ला घरी बसवेल. यांचं काही स्थान उरणार नाही, असे ते म्हणाले.
विरोधक मुख्यमंत्र्यांनी एकत्र येणं गरजेचं -
"महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना केंद्र सरकार सुरक्षा देतं हे चुकीचं आहे. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून वेळोवेळो त्रास दिला जातोय. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार के सी राव यांची भेट घेतील. केंद्र सरकारच्या जाचाविरोधात ममता बॅनर्जी, स्टॅलिन सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करणं गरजेचं आहे." अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.