मुंबई - एसटी कामगार संप (ST Employees strike) मिटवण्यास तयार आहेत. मात्र संपाचे नेतृत्त्व करणारे काही नेते त्यास चिथावणी देत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी संपकऱ्यांशी चर्चा केली. ती सकारात्मक होती, असे शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut)म्हणाले. हजारो कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
'संमजसपणाचे स्वागतच'
दोन नेते संमजसपणाची भूमिका घेतली असेल तर मी त्याचे स्वागत करतो. मात्र संप चिघळवत ठेवून सामान्य जनतेला वेठीस धरण्याची भूमिका घेतली जात आहे. असे राजकारण करू नये, असे राऊत म्हणाले. एसटी कामगारांचा काय गिरणी कामगार करायचा आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. संप सुरू करणाऱ्यांनी तो कुठे संपवायचा याचा विचार करावा, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पात्रता आहे का?
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते योग्य भाषेचा वापर करत नाहीत. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा उल्लेख आदरानेच करायला हवा. जे लोक टीका करीत आहेत, त्यांचे राज्याच्या विकासात काय योगदान आहे, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
कामगारांचे नुकसान
परिवहन मंत्री परब यांनी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. यावरती तोडगा शोधून त्यांनी या कर्मचाऱ्यांना एक चांगला पॅकेज दिले आहे. पगार वाढले आहेत.
त्याला पाठबळ देणारे काही राजकीय पक्ष संप ठेवणार असतील तर ते या कामगारांचे नुकसान करत आहेत. असे करू नका. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री, आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत संवेदनशील आहोत असेही राऊत म्हणाले.