मुंबई - पुरवण्या मागण्या आणि मध्येच विधेयकावर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी मंत्री एकमेकांमध्ये कुजबुज करत होते. अशातच शिवसेनेचे सदस्य व माजी मंत्री दिवाकर रावते आपल्या मंत्र्यांवर सभागृहातच भडकले. भाजपचे सदस्य सुरेश धस हे बोलत असतानाही कुजबुज थांबत नाही, हे लक्षात आल्याने रावते उठले आणि समोर बसलेले शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भडकले. सत्ताधाऱ्यांच्या अशा गप्पा चालत नाहीत, कधीपासून हे सांगत असताना काय सुरू आहे, सगळी विधेयकं चाललीत ना असे रावते यांनी खडसावून सांगितल्यामुळे समोर बसलेले सगळे मंत्री गप्प झाले.
दरम्यान, सेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेही सत्तार यांच्या समोरच्या बाजूला बसले होते. रावते यांचा अचानक सभागृहात भडकलेला अवतार पाहून तेही अवाक झाले. यावेळी भाजपचे सदस्य सुरेश धस हे पुरवण्या मागण्या पूर्ण झाल्यावर हवे तर सगळे विधेयक उरकून घेऊ, आमचे सहकार्य असेल असे बोलत होते. याच वेळेत रावते हे आपल्याच मंत्र्यांवर भडकले. याचीच संधी घेत धस यांनी आम्ही विरोधकांनी बडबड करायला हवे तर हेच करताहेत. आम्ही सगळे विधेयक अगोदर घेतले तर देवाची शपथ घेऊन सांगतो, सगळे ज्येष्ठ मंत्री निघून जातील, असे सांगत होते.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर मंत्रीपदापासून शिवसेनेचे नेते व माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते हे दूर राहिले आहेत. दोन दिवसांच्या अधिवेशनात त्यांनी कोणत्याही आयुधांवर फार बोलण्याचे धाडस केले नव्हते. मात्र, मध्येच त्यांनी आपल्या मंत्र्यांवर सभागृहात राग काढला.