मुंबई - लॉकडाऊनच्या परिस्थितीत रोजंदारीचे काम नसल्याने हाती पैसा नाही. खायला अन्न नाही आणि आपल्या गावी परतावे, तर प्रवासाचे साधन नाही, अशा दुष्टचक्रात मुंबईतील नाका कामगार फसले आहेत. तशीच गत घरकाम करणाऱ्या महिलांची झाली आहे. काम नसल्याने उपाशी राहायची वेळ आलेल्या धारावीतील नाका कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे.
शिवसेनेचे, स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांना या नाका कामगारांची दयनीय अवस्था कळली. त्यानंतर काही तासात सुमारे 100 नाका कामगारांना आणि महिलांना अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले.
उपविभागप्रमुख विठ्ठल पवार, शाखाप्रमुख सतीश कटके व खासदार शेवाळे यांचे स्वीय सहाय्यक सोनू कानोजिया यांच्याहस्ते तांदूळ, तूरडाळ आणि इतर साहित्य असे पॅकेट प्रत्येक कामगाराला देण्यात आले. ही मदत येत्या काळात आणखी वाढवली जाणार असल्याची माहिती खासदार शेवाळे यांच्या कार्यालयातून देण्यात आली. साधारण धारावीमध्ये 1 लाख घरेलू कामगार महिला आहेत. यांना ज्या घरी काम करतात त्या मालकांनी किमान वेतन तरी द्यावे, अशी विनंती देखील शेवाळे यांनी केली आहे.