मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोर वाढत असलेल्या अडचणी, केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या नेत्यांना करण्यात येत असलेलं लक्ष्य, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा झालेला पराभव, तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख वर्धापनदिनी शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे शिवसेनेचा वर्धापनदिन हा मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागला होता. दरम्यान, यावर्षीही शिवसेनेचा वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने शिवसेनेने वर्षापन दिनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १९ जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन हा ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार असून, त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत.