मुंबई - मुंबईवर भगवा फडकवण्याच्या नादात भाजप कोरोनाचा प्रसार वाढवत असल्याची टीका सामनाच्या आजच्या अग्रलेखात करण्यात आली आहे. स्वतः पंतप्रधान मोदी सोशल डिस्टंन्सचे भान राखा असे आवाहन करत असूनही भाजपाचेच नेते त्यांना ऐकत नसल्याचाही टोला लगावण्यात आला आहे. राज्य सरकारने हात धुवा हे सांगण्याशिवाय काय केले? असा सवाल करणाऱ्या भाजपा नेत्यांनादेखील सामनातून सणसणीत उत्तर देण्यात आले. वर्षभरापूर्वी तुम्हाला धुतले ते कमी झाले काय? असे म्हणत सामनातून भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
अतिरेकी वागण्यामुळे वाढतोय कोरोना -
भाजपाने महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा करून स्वतःचा कंडू शमवून घेतला. तोंडाला मास्क नाही, सोशल डिस्टंन्स नाही, वाहतुकीच्या नियमांचे पालन नाही. कोरोनाला मुके देत आणि मुके घेत सरकारविरोधी केलेला कार्यक्रम अमानुषतेचे लक्षण आहे, अशी खरमरीत टीका भाजपा नेत्यांवर करण्यात आली आहे. सरकार कोरोनाशी लढताना कमी पडत असल्याचे म्हणत, आपणच नियमबाह्य राजकीय गोंधळ घालून कोरोनाचा प्रसार वाढवत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येत आहे. मात्र, भाजपाला वाटतंय की ही त्यांच्या राजकीय विचारांची लाट आहे, असे खडे बोल सामनातून भाजपाला सुनावण्यात आले आहे.
दिल्लीतील परिस्थिी हाताबाहेर -
दिल्लीची कोरोना परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जात आहे. तिथे पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याची चिन्हे आहेत. दिल्लीतील कोरोनाची लाट मुंबईपर्यंत पोहोचू नये, यासाठी सरकार मुंबई-दिल्ली विमानसेवा आणि रेल्वेसेवा बंद करण्याबाबत विचार करत आहेत. दिल्ली फक्त अरविंद केजरीवाल यांची नाही, तर, देशाची राजधानी आहे. त्यामुळे त्यांना सर्वतोपरी मदत करणे केंद्राचे आहे, असे म्हणत केंद्र सरकारला कर्तव्याची आठवण करून दिली. सुरेश आंगडिया आणि रामविलास पासवान कोरोनाचे बळी ठरल्याचीही आठवण करून दिली.
लोकांच्या जिवाशी का खेळता?
पंतप्रधान मोदी स्वतः म्हणतात, की दुसऱ्या विश्वयुद्धानंतर कोरोना हे सर्वात मोठे संकट आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन सामना करणे गरजेचे आहे. जगासाठी हा उपदेश ठीक आहे मात्र, आपल्या देशाचे काय असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. आपल्याच देशात दिव्याखाली अंधार आहे. कोरोना महामारीचे रुपांतर भगवा फडवण्यासाठी राजकीय युद्धात रुपांतरीत केले जात आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी लोकांच्या जिवाशी खेळू नये, असे सामनात सांगण्यात आले आहे. तसेच महामारीचे बाप म्हणून लोकांना धोक्यात का ढकलता? असा सवालदेखील उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा - भरकटलेल्या शिवसेनेचा मूळ पायाच हरवला; प्रवीण दरेकरांचा निशाणा
हेही वाचा - तुमच्या भगव्या झेंड्याचे शुद्धीकरण करण्याची वेळ आलीय; भाजप नेत्याची खरमरीत टीका