मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 32 वर्षांतील पापाचा घडा भरल्याचा आरोप शिवसेनेवर केला आहे. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे. याच 32 वर्षांच्या कार्यकाळामध्ये राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांना हा पापाचा घडा दिसला नाही का? असा उलट प्रश्न मुंबईच्या महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'ते' भाजपा नेत्यांच्या पाया पडतात, सोबत फोटो काढतात..अन् ब्लॅकमेलिंग करतात; पोटे यांचा राणा दाम्पत्यावर आरोप
शिवसेनेचे राणेंना प्रत्त्युत्तर -
केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे मुंबईत आले आहेत. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर राणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. या भेटीनंतर राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, मुंबई महापालिकेत 32 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. 32 वर्षांतील पापाचा घडा भरला असून भाजप यावेळी मुंबई महापालिका जिंकेल, असे वक्तव्य केले आहे. यावर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, देशात लोकशाही आहे. कसे बोलावे, कसे वागावे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. नारायण राणे यांनी ज्या बत्तीस वर्षांच्या कालावधीचा उल्लेख केला आहे, त्या बत्तीस वर्षांत ते शिवसेनेकडून महापालिकेचे सदस्य होते, बेस्ट समितीचे ते चेअरमन झाले, राज्याचे मुख्यमंत्रीही झाले याची महापौरांनी आठवण करून दिली. ही पदे भूषवताना राणे यांना पापाचा घडा दिसला नाही का? असा प्रश्न महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात अव्वल ठरले - महापौर
नारायण राणे मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत नेहमी बोलत असतात. त्यांना मुख्यमंत्री मानत नाही, असे बोलतात. राणे ज्या मुख्यमंत्र्यांना मानत नाही अले बोलतात तेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात अव्वल ठरले आहेत. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुंबई पालिकेने चांगले काम करून दाखवले आहे. मुंबईकर, मुख्यमंत्री आणि पालिकेने कोरोनाचा प्रसार कमी करून दाखवला आहे. त्याची दखल देशभरात तसेच जगभरात घेण्यात आली आहे. यामुळे तुम्ही कितीही आकांडतांडव केला तरी किती लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतात हे मागचा इतिहास काढला तर आपल्याला कळते, असा टोला महापौरांनी लगावला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक सोपी आहे, असे आम्ही कधीच बोलत नाही. निवडणुकीत इतिहास-भूगोल बदलतो. प्रत्येक निवडणूक ही कठीणच असते. कठीण पेपर सोडवायला शिवसेनेला आवडते, असा टोला महापौरांनी भाजपचे नाव न घेता लगावला.
काय म्हणाले नारायण राणे -
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक झालो. साहेब आज तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे होता, जे काही घडलो, तुमच्यामुळे घडलो. आज बाळासाहेब असते तर आशीर्वाद दिला असता. बाळासाहेब नसले तरीही आशीर्वाद डोक्यावर आहेत. ते म्हणाले असते की, नारायण अशीच प्रगती करत रहा, अशा भावना नारायण राणे यांनी व्यक्त केली. कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो, विरोधाची भाषा नको, त्या भावनेचा आदर करायला हवा, असेही राणे म्हणाले.
ज्यांना विरोधात बोलायचे आहे त्यांनी स्वतः बोलावे, उजव्या डाव्यांना बोलायला लावू नये. आम्ही त्यांनाही थेट उत्तर देऊ. कोणी आपल्यात मांजरीसारखे आडवे येऊ नये, असेही राणे म्हणाले. येत्या महापालिका निवडणुकीत पापाचा ३२ वर्षांचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले. मुंबई महापालिका जिंकणे हीच जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिली आहे. काहीही झाले तरीही महापालिका जिंकणारच, असेही ते म्हणाले. मुंबई महापालिकेसाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर साऱ्यांकडेच जबाबदारी दिली आहे. आता कोरोनाचे नियम सांगून उगाच उपदेशाची भाषा करू नये. सत्तेतील फारच थोडे दिवस राहिले असल्याचे राणे म्हणाले.
हेही वाचा - अमरावतीतील पोलीस उपनिरीक्षकाच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण ! ऑडिओ क्लिप व्हायरल