मुंबई - शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडानंतर बहुतांश वर्ग एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटात सामील होत आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर गंडांतर आणण्याच्या हालचाली शिंदे गटाकडून सुरू झाल्या आहेत. तर, शिवसेनेचे अस्तित्व पणाला लावण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चंग बांधला आहे. गेल्या वीस दिवसांत तब्बल १३ बैठका घेऊन पक्षबांधणीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भर दिला आहे. पक्ष सोडून गेलेले शिवसेनेचे पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू झाली ( Uddhav Thackeray Get 13 Meeting In 20 Days ) आहे.
सेनेचे बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व - विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या ४० आमदारांना एकनाथ शिंदे यांनी सुरतमध्ये नेत बंड ( 40 Shivsena Rebel MLA ) केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबतची आघाडी तोडून भाजपसोबत युती करण्याची भूमिका घेतली. राज्यातील मविआ सरकारचे संख्याबळ घटल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खेचत, भाजपसोबत सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिंदेंनी शिवसेनेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सामावून घेत, सेनेचे बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व निर्माण करत आहेत. बारा आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने धनुष्यबाण चिन्हासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. मात्र, चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ द्यायचा नाही, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कंबर कसली आहे. त्यामुळे सेनेतील गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत.
संघटनेत ठाकरे गटाचे वर्चस्व - युवासेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नुकतीच निष्ठा यात्रा काढली. आता राज्यभरात शिवसंवाद यात्रा सुरु आहे. दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री आणि शिवसेना भवनावर बैठकांचा सपाटा लावला आहे. उद्धव ठाकरे आणि गेल्या वीस दिवसांत तेरा बैठका घेतल्या. शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम ठाकरे करत आहेत. मुंबईतून पाच आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेला आहे. तर, संघटनेत ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. मुंबईत आजच्या घडीला १८५ शिवसेनेच्या शाखा आहेत. अशातच ठाकरे यांच्याकडे सर्व पदाधिकारी आहेत. याचा फारसा परिणाम यामुळे शिवसेनेवर होणार नाही. मात्र, चिन्हासाठी निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी मधील फुटीपेक्षा पदाधिकाऱ्यांच्या मधील फूट गृहीत धरणार आहे. शिंदे गटाला यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोडावे लागणार आहे.
उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडत आहे. तर, दुसरीकडे शिवसेना सोडून गेलेले जुने शिवसैनिक पुन्हा स्वगृही येत आहेत. त्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याशिवाय शिवसेना तयार करण्याचे शिंदे गटाचे मनसुबे फोल ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले; म्हणाले, 'गद्दार नजरेला नजर मिळवू...'