मुंबई - भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यावर भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेत भाजपने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते पद भरताना भाजपने आपल्याला हे पद नको असल्याचे सांगितले. त्यामुळे हे पद त्यावेळी काँग्रेसला देण्यात आले. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनीच आम्ही पहारेकरी म्हणून जबाबदारी पार पाडू, असे सभागृहात स्पष्ट केले होते. यामुळे आता विरोधी पक्षनेते पद देणे शक्य नसल्याने आता भाजपने पहाराच देत बसावे, असा टोला शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी लगावला आहे. तर, सत्ता गेल्याने भाजप हडबडली असून विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपने सर्वोच्च न्यायालयात जावे, अशी खिल्ली विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उडवली.
मुंबई महापालिकेत २५ वर्षे शिवसेना आणि भाजप सत्तेत होती. २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यावर २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगळे लढले. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यावेळी दोन महिने विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. विरोधी पक्षनेते पद भरताना भाजपने आम्हाला हे पद नको आम्ही पहारेकऱ्याची भूमिका पार पाडू, असे स्पष्ट केले होते. यामुळे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्यात आले. निवडणुका झाल्यानंतर तीन वर्षांनी भाजपने राज्यात युती तुटल्यावर पालिकेत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजपने महापौरांना पत्र देऊन गटनेते व विरोधी पक्षनेते पदावर प्रभाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे कळविले होते. मात्र, आधीच गटनेते पदावर काँग्रेसच्या रवी राजा यांची नियुक्ती झाली असल्याने भाजपचा विरोधी पक्षनेते पदावरचा दावा फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
भाजपने पहाराच देत बसावे -
याबाबत बोलताना आम्ही चुका केलेल्या नाहीत. चुका भाजपच्या नेत्यांनी केल्या आहेत. मनोज कोटक यांनी आम्हाला विरोधी पक्षनेते पद नको आम्ही पहारेकरी म्हणून सभागृहात बसू, असे सांगितले होते. त्यामुळे कायदा विभागाचा अभिप्राय घेऊन आणि न्यायालयाचे अशा प्रकरणी दिलेले आदेश याचा विचार करून विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्यात आले आहे. भाजपने आता प्रभाकर शिंदे यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले. तसे पत्र महापौरांना दिले. गटनेता हाच विरोधी पक्षनेता होऊ शकतो हे माहीत पडल्यावर पुन्हा शिंदे गटनेते असल्याचे दुसरे पत्र देण्यात आले. पालिकेच्या कायद्यानुसार भाजपाला विरोधी पक्षनेते पद मिळू शकत नाही हे माहीत असतानाही त्यांचे मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी तसे पत्र दिले. त्यांना शिंदे यांना गटनेते, विरोधी पक्ष नेते बनवायचे नव्हते म्हणून असा प्रकार करण्यात आल्याचा आरोप सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला आहे. आपल्या पक्षाच्या चुकांचे खापर भाजपावाल्यांनी दुसऱ्या पक्षांवर फोडू नये. भाजपावाल्यांना कोणाला दोष द्यायचाच असेल तर त्यांनी आपल्या नेत्यांना द्यावा शिवसेनेला देऊ नये, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. भाजपला पहारेकरी बनण्याची हौस होती, त्यामुळे त्यांनी आता पहारा देतच बसावे असा टोलाही राऊत यांनी लगावला.
भाजपवाल्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे -
२०१७ मध्ये भाजपने विरोधी पक्षनेते पद नको असे म्हटले होते. त्याची सभागृहात नोंद आहे. भाजपाची सत्ता गेल्याने ते हडबडले आहेत. त्यांना काय करायचे हेच माहीत नाही. भाजपने पाच वर्ष सत्ता उपभोगली आहे. आता ते विरोधी पक्षात बसले आहेत. त्यामुळे त्यांना रस्तावर उतरने माहीत नसल्याने त्यांना रस्तावर उतरू द्या, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटले आहे.
भाजपवाल्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची घाण करून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपवाले पहारेकरी नसून सोयीस्कर पहारेकरी झाले असल्याचा टोला त्यांनी लगावला. २५ वर्ष भाजपवाल्यांनी सोबत राहून शिवसेनेला संपवण्याचे काम केले. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी बनली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने विरोधी पक्ष नेते पदासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना मला पालिकेच्या कायद्याप्रमाणे विरोधी पक्ष नेते पद मिळाले आहे, त्यामुळे त्यांनी न्यायालयात नव्हे तर सर्वोच्च न्यायालयात जावे, अशी खिल्ली रवी राजा यांनी उडवली.
हेही वाचा -
महिला दिन विशेष : कर्तृत्ववान एकता कपूरचा इंटर्नशीप ते पद्मश्रीपर्यंतचा संघर्षमय प्रवास
VIDEO : महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद, आश्चर्यकारकरित्या वाचला जीव..