मुंबई - महापालिकेतील पाच नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने बोगस ठरवले. त्याविरोधात या नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यापैकी दोन जणांना दिलासा देताना इतर तीन जणांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. या तीन नगरसेवकांच्या जागी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे. या निर्णयामुळे शिवसेनेचे ३ नगरसेवक वाढणार आहेत. त्यामुळे शिवसेनेत खुशीचे तर भाजपमध्ये गमचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ७६ मधील भाजपच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ६७ च्या भाजप नगरसेविका सुधा सिंग, प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने खोटे ठरवले होते. जात पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात पाचही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. आज उच्च न्यायालयाने नगरसेवकांची याचिका फेटाळून लावल्याने काँग्रेसचे राजपती यादव, भाजपचे मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.
न्यायालयाने याचिका फेटाळल्याची माहिती पालिका आयुक्तांमार्फत सभागृहाला दिल्यावर या ३ नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. या तिघांच्या जागी २०१७ च्या निवडणुकीवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेले भाग क्रमांक २८ मध्ये एकनाथ हुंडारे (शिवसेना), प्रभाग क्रमांक ७६ मध्ये नितीन बंडोपंत सलाग्रे (काँग्रेस), प्रभाग क्रमांक - ८१ मध्ये संदीप नाईक (शिवसेना) यांना पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. तसेच काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ३२ च्या नगरसेविका स्टेफी किणी यांचे नगरसेवक पद गेल्या १८ डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले होते. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रभाग क्रमांक ३२ च्या शिवसेनेच्या उमेदवार गीता किरण भंडारी यांनादेखील पालिकेत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे.
कसे वाढणार शिवसेनेचे नगरसेवक
आज दिलेल्या निकालामुळे भाजपच्या दोन तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे पद रद्द झाले आहे. या तिघांच्या जागी दोन शिवसेनेचे तर एक काँग्रेसचा नगरसेवक वाढणार आहे. तसेच काँग्रेसच्या स्टेफी केणी यांच्या जागीही शिवसेनेच्या नगरसेविकेला संधी मिळणार आहे. यामुळे शिवसेनेचे तीन नगरसेवक वाढणार आहेत.
महिला नगरसेविकांना दिलासा
प्रभाग क्रमांक ६७ च्या भाजप नगरसेविका सुधा सिंग यांना न्यायालयाने त्यांचा जातीचा दाखला वैध ठरवत त्यांना दिलासा दिला आहे. तर प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र परत न्यायालयाने फेर तपासणीसाठी जात पडताळणी समितीकडे पाठवले आहे. यामुळे या दोन महिला नगरसेविकांना दिलासा मिळाला आहे.
या निर्णयानंतर असे असेल पालिकेतील संख्याबळ
शिवसेना ९३ + ३ = ९६
भाजप ८५ - २ = ८३
काँग्रेस ३०
राष्ट्रवादी काँग्रेस ९
समाजवादी ६
एमआयएम २
मनसे १