मुंबई - शिवाजी पार्कमध्ये पावसाचे पाणी तसेच चिखल होत आहे. दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क येथे साचणारे पावसाचे पाणी, तसेच होणारा चिखल यावर तोडगा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( Greater Mumbai Municipal Corporation ) पावसाळ्याआधीच शिवाजी पार्क येथील 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'च्या कामाला सुरुवात केली. मात्र, या कामाचा आता उलट परिणाम दिसत आहे. शिवाजी पार्कमध्ये पावसाचे पाणी तसेच चिखलाचे सामराज्य वाढत चालले आहे. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS leader Sandeep Deshpande ) यांनी आवाज उठवला असून, संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
चार महिन्यांपूर्वी आम्ही सांगितलं होतं - यावेळी टीव्ही भारतशी बोलताना संदीप देशपांडे ( Sandip Deshpande ) म्हणाले की, "आपण जर पाहिलं तर याच विषयावरून चार महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( Maharashtra Navnirman Sena ) आंदोलन केलं होतं. त्यावेळी देखील आम्ही हेच सांगत होतो. हा जो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प सुरू आहे, तो ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच पद्धतीने त्याची वाट लागणार. त्यामुळे आता आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने या पाण्याचा निचरा व्हायला हवा होता त्या पद्धतीने होत नाहीये."
प्रकल्पासाठी 4 कोटींचा खर्च - "याच पाणी प्रश्नावर मनसेने देखील काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्या वेळच्या सरकारने याला स्थगिती देत या कामासाठी तब्बल चार कोटी रुपयांचा खर्च केला. इतका पैसा खर्च करून देखील आज काय स्थिती आहे. हे आपल्या डोळ्यांना दिसते. इथं यांनी हजार हजार ट्रक माती टाकली. आता पावसाळ्यात चिखल झालाय. त्यामुळे हे जे साठलेलं पाणी खाली ज्या बोरवेल लावलेल्या आहेत त्या बोरवेलमध्ये जाणं आवश्यक आहे. चिखलामुळे या पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. त्यामुळे या मुंबईकरांच्या चार कोटी रुपयांचा अक्षरशः चुराडा महानगरपालिकेने केला" असल्याचे देशपांडे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांची चौकशी करा - पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "आम्ही चार महिन्यांपूर्वी जे सांगत होतो ते ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. या सर्व परिस्थितीला जबाबदार त्यावेळचे वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर, त्यावेळेचे मंत्री आदित्य ठाकरे ( Inquire about Aditya Thackeray ) जबाबदार आहेत. त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करतो की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. यात जे कोण दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी." अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Flood In Chandrapur: चंद्रपूरमध्ये पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले