मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेन'च्या अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा - शिवभोजन केंद्रांना प्रतिथाळी 50 रुपये अनुदान द्या, ग्रामीण भागातील केंद्रचालकांची मागणी
'किंमतीमध्ये कोणताही बदल नाही'
कोरोनाकाळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रांवरदेखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची त्यांनी दिली. सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. त्याचबरोबर ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा - सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने शिवभोजन थाळी, कोरोनासाठी दिलेली मदत वादात; उच्च न्यायालयात याचिका
'...तरच आपण कोरोनाला रोखू शकतो'
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने "ब्रेक दि चेन" या मोहिमेअंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो, त्यामुळे सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.