मुंबई - बॉलिवूडमधील अमलीपदार्थ सेवनाचा मुद्दा आता संसदेतही पोहोचला असून यावरून वादंग सुरू झाले आहे. सिनेसृष्टीत अमलीपदार्थांचा वापर सर्रास होत असल्याचा आरोप भाजपा खासदार अभिनेते रावीकिशन यांनी केला होता. याला खासदार अभिनेत्री जया बच्चन यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर अनेकांनी जया बच्चन यांचे समर्थन केले असून, शिवसेनेने देखील 'सामना'च्या अग्रलेखातून मुंबई आणि बॉलिवूडवर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच बॉलिवूडवर टीका करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचे समर्थन केले आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात-
भाजपe खासदार रवीकिशन यांनी बॉलिवूडमध्येही अमलीपदार्थांची तस्करी करणारे लोक आहेत, असे म्हटले होते. याला उत्तर देताना बच्चन म्हणाल्या की, मोजक्याच लोकांमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला तुम्ही कलंक लावू नये , सध्याची बेरोजगारी व बिघडलेली आर्थिक परिस्थिती यावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी आपण हे करत आहात, असा आरोप त्यांनी केला. याबाबत शिवसेनेच्या मुखपत्रातून जया बच्चन यांना समर्थन करत त्यांची भूमिका परखड व महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे.
सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. हिंदी सिनेसृष्टीने जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केला आहे. हॉलीवूडच्या बरोबरीने तुमच्या बॉलिवूडचे नाव घेतले जाते. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, अझिम प्रेमजी आहेत, तसे नीरव मोदी, मल्ल्या आहेत. सिनेसृष्टीच्या बाबतीतही तसेच म्हणावे लागेल. 'सब घोडे बारा टके' असे सरसकट म्हणणे, हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली आहे. त्यातून किती कलावंतांना कंठ फुटतो ते पाहू, असे सामनाच्या अग्रलेखात आज म्हटले आहे.
खाल्ल्या मिठाला न जगणारे लोक-
हिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे, असा दावा कोणीच करणार नाही. पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना काल बोलून दाखवली आहे. ‘‘ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही.’’ जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची, तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात. अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे. बच्चन या सत्य आणि परखड बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपली राजकीय, सामाजिक मते कधीच लपवून ठेवलेली नाहीत. महिलांवरील अत्याचारांबाबत त्यांनी संसदेत अत्यंत भावुक होऊन आवाज उठवला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी जया बच्चन यांची बिजली कडाडली आहे. मनोरंजन उद्योग रोज पाच लाख लोकांना सरळसोट रोजगार देतो. सध्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ‘लाइट, कॅमेरा, ऍक्शन’ बंद असताना लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवण्यासाठी आम्हाला (म्हणजे बॉलीवूडला) सोशल मीडियावर बदनाम केले जात आहे, असे जया बच्चन यांनी सांगितले आहे. काही नट-नट्या म्हणजे संपूर्ण बॉलिवूड नव्हे. पण त्यातलेच काहीजण ज्या बेतालपणे वक्तव्ये करीत आहेत, तो सर्वच प्रकार घृणास्पद आहे.
बहुतेकांचे खायचे दात, आणि दाखवायचे दात वेगळे-
सिनेसृष्टीतील यच्चयावत सगळे कलाकार किंवा तंत्रज्ञ हे जणू ‘ड्रग्ज’च्या जाळ्यात अडकले आहेत, चोवीस तास गांजा, चिलमीचे झुरके मारीत दिवस ढकलत आहेत, असे सरसकट विधान करणाऱ्यांची ‘डोपिंग’ टेस्ट व्हायला हवी. कारण, यापैकी बहुतेकांच्या बाबतीत खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. हिंदुस्थानी सिनेसृष्टीस एक परंपरा आणि इतिहास आहे. ही मायानगरी असेलही, पण या मायानगरीत जसे ‘मायावी’ लोक आले आणि गेले, तसे अनेक संतसज्जनही होतेच. ज्या दादासाहेब फाळके यांनी हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पाया रचला, ते महाराष्ट्राचेच होते. दादासाहेब फाळके यांनी मोठ्या कष्टातून या साम्राज्याचे तोरण बांधले, असे म्हणत आज अनेक चांगल्या कलाकारांचे कौतुक सामनातून केले आहे. तसेच सत्ताधारी आणि कलाविश्वाशी बेईमानी करणाऱ्यांचा समाचार घेत, हेच कलाविश्व संकटसमयी सर्वतोपरी मदतीसाठी पुढे सरसावले आहे, यावरही सामनातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.