मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या आमदारांनी गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. शिवसेनेचे 45 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा एकनात शिंदे यांनी केला आहे. मात्र शिवसेनेकडूनही आपल्याकडे 18 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र शिवसेनेसोबत सध्या 13 आमदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाचा उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचे काय आहे कारण याबाबतचा खास आढावा.
आदित्य ठाकरे - वरळी मतदार संघ
आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदार संघातून आमदारपदी निवडून आले आहेत. आदित्य ठाकरे हे संसदीय राजकारणात उतरलेले ठाकरे कुटुंबाचे पहिलेच सदस्य होते. ऑक्टोबर 2012 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या, असे भावनिक आवाहन केले. त्यावेळी आदित्य 22 वर्षांचे होते आणि युवा सेनेचे अध्यक्ष होते. 2010 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी युवासेनेची स्थापना करत आदित्य ठाकरे यांना राजकारणात आणले. आता ते 32 वर्षाचे असून शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आहेत. त्यांचे शिक्षण सेंट झेविअर्स शाळेत आणि के. सी. महाविद्यालयातून झाले. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. 2007 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी त्यांच्या 'माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक' या हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. नंतर 'उम्मीद' नावाचा 8 गाण्यांचा अल्बमही प्रसिद्ध झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक कार्यात आदित्य ठाकरे यांचे महत्वाचे योगदान असते.
अजय चौधरी - शिवडी
अजय चौधरी हे शिवडी मतदार संघातील आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांची शिवसनेचे गटनेते म्हणून निवड केली. मात्र एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्यामुळे आपणच गटनेते असून अजय चौधरींची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. 2019 मध्ये विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी 40 हजार मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला होता.
रवींद्र वायकर - जोगेश्वरी पूर्व मतदार संघ
रवींद्र दत्ताराम वायकर हे शिवसेनेचे नेते आहेत. १४ व्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदार संघातून निवडून आले आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन टर्म रवींद्र वायकर हे आमदार राहिलेत. या पूर्वीच्या सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्या कडे तंत्र आणि उच्चशिक्षण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली होती. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.
सुनिल प्रभू
सुनिल प्रभू यांनी 1992 साली शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांचे खासगी सचिव म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दिंडोशी - मुंबई मतदार संघातून ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते 1997 साली पहिल्यांदा आरे कॉलनी या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2002, 2007 व 2012 साली ते नगरसेवक म्हणून सतत निवडून आले. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणूनही त्यांनी सहा वर्ष काम पाहिले आहे. आमदार सुनिल प्रभू हे शिवसेनेचे विधानसभेतील प्रतोद म्हणून काम पहातात. सध्या उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
अनिल परब
मागील २० वर्षांपासून अनिल परब शिवसेनेत कार्यरत आहेत. अनिल दत्तात्रय परब असे, त्यांचे पूर्ण नाव आहे. बी.कॉमचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी एलएलबीचे (वकील) शिक्षण घेतले. वकिली करताना नेहमी सामाजिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्सवांचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकाचे वाटप अशा विविध कार्यक्रमातून त्यांनी राजकारणात एन्ट्री केली. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या आंदोलनात देखील ते सक्रिय होते. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने गाजवली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी २००१ मध्ये अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. तर २००४ मध्ये त्यांना पहिल्यांच विधान परिषदेवर पाठवले. सलग १४ वर्षे (२०१८ पर्यंत) विधान परिषदेचे सदस्य आहेत. सन २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संसदीय कार्यमंत्री आणि परिवहन मंत्री पदाची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे दिली आहे. वांद्रे पश्चिममधील २०१५ च्या पोटनिवडणूकीची जबाबदारी अनिल परब यांच्यावर होती. शिवसेनेकडून तृप्ती सावंत उमेदवार होत्या तर काँग्रेसकडून नारायण राणे उमेदवार होते. यावेळी राणे यांचा पराभव करण्यात परब यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे अनिल परब यांच्यावर शिवसेनेकडून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
रमेश कोरगावकर भांडूप ( पश्चिम )
रमेश कोरगावकर हे शिवसेनेचे भांडूप पश्चिम मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी 2002 ला पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग ते शिवाजीनगर वार्डाचे प्रतिनिधीत्व करत होते. 2017 ला त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदही भूषवले होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांना भांडूप पश्चिम मतदार संघाचे तिकीट देऊन आमदार केले.
सुनिल राऊत ( विक्रोळी मतदार संघ )
शिवसेनेची धडाडीची तोफ संजय राऊत यांचे सुनिल राऊत हे भाऊ आहेत. शिवसेनेने त्यांना मुंबई सहकारी बँकेचे तिकीट दिले होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांना आमदारकीसाठी तिकीट दिले. त्यामुळे संजय राऊत हे राज्यसभेवर खासदार तर सुनिल राऊत हे आमदार आहेत. सुनील राऊत यांचा विक्रोळी मतदार संघात मोठा दबदबा आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांना राज्यसभेच्या निवडणुकीला तीव्र विरोध दर्शवला होता. भाजपला माघार घेऊन खासदार मनोज कोटक यांना संधी द्यावी लागली होती.
वैभव नाईक - कुडाळ मतदार संघ
वैभव नाईक हे कोकणातील शिवसेनेचे मोठे प्रस्थ म्हणून गणले जाणारे नेतृत्व आहे. नारायण राणे यांचा प्रखर विरोधक म्हणून शिवसेनेने वैभव नाईकांवर जबाबदारी टाकली आहे. वैभव नाईक यांनीही शिवसेनेनेचे कोकणात कुडाळचा गड राखून ठेवला आहे. वैभव नाईक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात.
प्रकाश फातर्पेकर ( चेंबूर विधानसभा मतदार संघ )
चेंबूर विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन निवमडणुकांपासून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. प्रकाश फातर्पेकर हे २०१४ आणि २०१९ असे दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेले प्रकाश फातर्पेकर २००७ मध्ये मुंबई महानगर पालिकेवर निवडून आले. तिथे स्थापत्य समिती, सुधार समिती, आरोग्य समिती अशा विविध समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून भूमिका निभावली.
संजय पोतनीस ( कलिना विधानसभा मतदार संघ )
कलिना हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार संघातून संजय पोतनीस निवडून आले आहेत. काँग्रेसचे एकेकाळचे बडे नेते असलेल्या कृपाशंकर सिंह यांचा हा मतदारसंघ होता. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पोतनीस यांनी कृपाशंकर सिंह यांचा पराभव केला आहे. खासदार गजानन किर्तीकर यांचे निकटवर्तीय म्हणून पोतनीस यांची ओळख आहे.
दिलीप मामा लांडे ( चांदिवली विधानसभा मतदार संघ )
चांदिवली विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर दिलीप मामा लांडे निवडणूक आले आहेत. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेत गेल्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेने त्यांना विधानसभेची तिकीट दिली. नसीम खान यांचा पराभव करुन कॉंग्रेसचा गड असलेल्या चांदिवलीत शिवसेनेचा झेंडा फडकावला आहे.
उदय सामंत ( रत्नागिरी मतदार संघ )
उदय सामंत हे गेली 20 वर्ष राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले. त्यानंतर सलग चारवेळा (2004, 2009, 2014, 2019) आमदार होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते आमदारपदी निवडून येत आहेत. 2013 मध्ये उदय सामंत यांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्रिपद मिळालं. 2018 मध्ये त्यांची ‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तरुण वयात मिळालेली आमदारकी, जुन्या जाणत्या नेत्यांचे घरी येणे जाणे, त्यामुळे समाजकारण व राजकारणाचे मिळालेले बाळकडू. या सगळ्यांतून उदय सामंत यांची राजकीय कारकीर्द घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आयत्यावेळी शिवसेनेत प्रवेश केल्यावरही आधीपेक्षा अधिक मते मिळवून विजयी झाले. कार्यकर्त्यांशी आपुलकीने बोलणे, त्यामुळे भोवती अनेक कार्यकर्त्यांचा गराडा असतो. नेतृत्व गुण, संघटन, कौशल्य, हजरजबाबीपणा अवगत असल्याने ते शिवसेनेतही रुजले. सध्या राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. उद्धव ठाकरेंच्या जवळचे नेते म्हणून त्यांची शिवसेनेत ओळख आहे.
राजन साळवी (राजापूर, रत्नागिरी) -
राजन साळवी हे राजापूरचे शिवसेना आमदार, मुळचे रत्नागिरीचे. बाळासाहेबांचे ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. 2009 मध्ये पहिल्यांदा ते राजापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येऊन विधानसभेवर गेले. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्येही ते विजयी झाले. आमदारकीची हॅटट्रिक त्यांनी केली आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातील 2006 साली शिवसेनेचे तत्कालीन आमदार गणपत कदम हे नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे 2006 मध्ये झालेल्या पोटनिवडणूकित राजन साळवी यांना शिवसेनेकडून रिंगणात उतरवण्यात आलं. त्यावेळी त्यांचा 3700 मतांनी पराभव झाला. मात्र त्यानंतर राजन साळवी यांनी मतदारसंघ पुन्हा नव्याने बांधला. आणि 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र साळवी दणदणीत विजय मिळवला. आणि 2014 च्या निवडणुकीतही शिवसेनेचा झंझावत कायम ठेवला. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही विजय संपादन केला. या निवडणुकीत राजन साळवींनी वर्चस्व राखत काँग्रेस उमेदवार अविनाश लाड यांचा 11876 मतांनी पराभव केला.