मुंबई - 'मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे. जो मला धमकी देईल, तो राहणार नाही,' असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज विरोधकांवर केला आहे. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते. दरम्यान, ईडीने वर्षा राऊत यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले असून त्यांना ५ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
संजय राऊत म्हणाले..
'आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. ज्यांच्याकडे लपवण्यासारखं असतं, ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतात. आम्ही शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे. जो मला धमकी देईल, तो राहणार नाही,' असा हल्लाबोल राऊत यांनी विरोधकांवर केला.
हेही वाचा - शिवसेनेचा काँग्रेसला सवाल - प्रादेशिक नेतृत्वाचे मन वळवण्याचे काम कोण करणार?
आम्ही कायदे बनवतो
मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मी संसदेचा सदस्य आहे. आम्ही कायदे बनवतो. आम्ही कायद्यावर चर्चा करतो. जर, सरकारच्या एका यंत्रणेकडून एखादा कागद आला असेल त्याचा आदर करणे आमचे कर्तव्य आहे. मी अजूनही ईडीची नोटीस पाहिली नाही. त्याची मला गरजही वाटत नाही. पण तिचे उत्तर देणार आम्ही आहोत. भाजपच्या त्या तीन नेत्यांबद्दल विचारले असता हळूहळू त्यांची माहिती देणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.
ईडीला काही काम नाही
'ईडीला काही काम राहिलेले दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचे विरोधकांचा मानसिक छळ करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे दिसत आहे. त्यांनाही काही काम हवे. त्यांना सरकारचे आदेश पाळण्याचे काम करावे लागत आहे. मला ईडीची कीव येते', असे राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा - पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार - अजित पवार