मुंबई - विधानसभेची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते. मात्र युतीच्या जागा वाटपाचे कोडे अद्यापही सुटले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. त्यासाठी विदर्भातील इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवार आणि शनिवारी शिवसेना भवनमध्ये पार पडल्या. विदर्भात शिवसेनेची ताकद फारशी नसली तरी विदर्भातील 62 जागांसाठी 250 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यात तरुण शेतकरी, शैक्षणिक संस्थाधारक, रिअल इस्टेट व्यावसायिक, शिक्षक यांचा समावेश आहे. अमरावती, बुलडाणा आणि नागपुरमधून सर्वाधिक इच्छुकांनी हजेरी लावली.
विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यात भाजपला 45 तर शिवसेनेकडे वरोरा, दिग्रस आणि सिंदखेडराजा अशा तीनच जागांवर विजय मिळवता आला. 2014 साली भाजप शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने सेनेच्या जागा भाजपकडे गेल्या होत्या. त्या जागा पुन्हा मिळवण्यासाठी सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सेनेने स्वबळावर निवडणूक लढवावी, आम्हीच विजयी होऊ असा विश्वास विदर्भातील इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केला.