मुंबई - अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. आमदार लटके हे दुबईत त्यांच्या मित्राला भेटायला गेले होते. बुधवारी रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रमेश लटके हे ५२ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
असा आहे आमदार लटके यांचा राजकीय प्रवास - आमदार रमेश लटके हे १९९७ साली मुंबई महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतरच्या सन २००२ आणि २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत सलग तीन टर्म नगरसेवक होते. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बढती मिळाली आणि काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांचा पराभव करुन अंधेरी पूर्व येथून पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार एम. पटेल यांचा पराभव केला. अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.
कुटुंबीयांसोबत गेले होते दुबईला - आमदार रमेश लटके हे नुकतेच कुटुंबासमवेत दुबईला गेले होते. दरम्यान, हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचे निधन झाले. लटके यांच्या निधनाची माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. तर परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, रमेश लटके हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी दुबईला गेले होते. त्यांचे कुटुंबीय खरेदीसाठी बाहेर गेले असताना, त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे परब यांनी सांगितले. आमदार रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणण्याची तयारी सुरू झाली असल्याचेही ते म्हणाले.