मुंबई : शिवाजी पार्क मैदानावर गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय. शिवसेनेची 1967 पासूनची ही परंपरा कायम आहे. मात्र यावर्षी त्या परंपरेत खंड पडू शकतो. कारण शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेणार कोण? यावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये वाद सुरू आहेत.
दोन्ही गटाला नाकारली परवानगी : दोन्हीकडून मुंबई महानगरपालिका आणि मुंबई उच्च न्यायालय येथे दसरा मेळावा आपलाच व्हावा यासाठी दावे करण्यात आले होते. त्यापैकी मुंबई महानगरपालिकेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत दोन्ही गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली. तर, तेथेच आज मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधी सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी ची तयारी सुरू असली तरी मुंबईतील बीकेसी मैदानावर त्यांनी पर्याय म्हणून मैदान घेतल आहे.
दसरा मेळावा घेण्यासाठी शोधला जातोय पर्याय : आज मुंबई उच्च न्यायालयात दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यास संबंधित सुनावणी होणार असून न्यायालयाने शिवसेनेला देखील परवानगी नाकारल्यास दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडून पर्याय शोधायला सुरुवात झाली, असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी पर्याय म्हणून गोरेगाव येथील नेस्को संकुल, महालक्ष्मी रेस कोर्स आणि गिरगाव चौपाटी चा पर्याय शोधला जात आहे. त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार का नाही याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे जर उच्च न्यायालयाने देखील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत दोन्ही गटाला मेळावा घेण्यास परवानगी दिली नाही. तर शिवसेनेसाठी हे पर्याय उपलब्ध असल्याची चर्चा सध्या आहे.