मुंबई - बीकेसी मैदानावर उद्या मुख्यमंत्री शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्याच्या तयारीचे मैदानावरील सर्व काम पूर्ण झाले आहे. उध्दव ठाकरे यांच्या तडजोडीचे जुने व्हिडीओ यावेळी दाखवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेसवरीलही व्हिडीओ यावेळी दाखवण्यात येणार आहेत. 51 फुटी तलवारीचे पूजन यावेळी करणार आहेत. यावेळी 40 बाय 120 फूट स्टेजवर मोठ्या प्रमाणात एनिमिशेनही करण्यात येणार आहे.
५१ फुटी तलवार - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि फुटीर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. बिकेसी मैदानात बाळासाहेब ठाकरे यांची ॲनिमेशन मधून प्रतिमा साकारली जाणार आहे. शिवाय, ५१ फुटी तलवारीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांना १२ फुटी चांदीची तलवार भेट दिली जाणार आहे.
४०० बाय १२०० फुटी मंच - शिवसेनेचा दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दादर येथील शिवतीर्थ तर फुटीर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा बीकेसी मैदानात मेळावा होणार आहे. मेळाव्याची जय्यत तयारी दोन्हींकडून अंतिम टप्प्यात आली आहे. बीकेसी मैदानात शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी ४०० बाय १२०० फुटी मंच तयार केला आहे.
४० व्हिडीओ मंचावर दाखवले जाणार - या मंचावर शिवसैनिक किंवा कार्यकर्तेच नव्हे तर ठाकरे परिवारातील कुटुंब शिंदे गटासोबत बसण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा उद्धव ठाकरे यांनी सोडला हे, दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच, दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांचे भाषणाचे समीकरण. त्यामुळे शिंदे गटाकडून बाळासाहेबांचे जुन्या ४० व्हिडीओ मंचावर दाखवले जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी कशा प्रकारे बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली हे त्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे.
नवा विक्रम - शिवसेनेतून बंडखोरी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळाव्यात प्रमुख भाषण असणार आहे. त्यांच्याशिवाय भाषण करणाऱ्या अन्य आठ वक्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात होईल. यावेळी ५१ फुटी तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना १२ फुटी चांदीची तलवार देण्यात येणार आहे. या आधी गीनिज बूकमध्ये ११ फुटी चांदीच्या तलवारीची नोंद आहे. त्यामुळे हा नवा विक्रम करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असणार आहे.
मेळाव्यासाठी दोन ते तीन लाख लोक - शिंदे गटाच्या या मेळाव्यासाठी दोन ते तीन लाख लोक येतील, असे नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या या लोकांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी व्यासपीठाच्या बाजूला व्यवस्था केली आहे. तसेच, मुंबईचा ओळख असलेल्या वडापावला मोठी मागणी असल्याने सुमारे पाच लाख वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांची सोय केल्याची माहिती शिंदे गटाकडून देण्यात आली.