मुंबई - महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आणि शिंदे यांना समर्थन देण्यात आघाडीवर असलेल्या माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना सर्वात आधी बक्षिस मिळाले आहे. गेल्या तीन दशकांपासून सुमारे ४० गिरण्या भाग भांडवलासाठी सरकारकडे डोळे लावून आहेत. त्यातच आता सत्तार यांच्या सुतगिरणीला चार दिवसांत १६ कोटी रूपये मंजूर करण्यात आले ( Government Sanctioned 16 Crores For Abdul Sattar National Cooperative Mill ) आहेत.
चार दिवसांत झाली निधी मंजूरीची प्रक्रिया - औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमधील नॅशनल सहकारी सूतगिरणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ जुलै रोजी अर्थसहाय्यासाठी निवड करण्यात आली. लगेच ७ जुलै रोजी ८० कोटी ७० लाख रुपयांचा प्रकल्प मंजुर करण्यात आला. तर, १३ जुलै रोजी १५ कोटी १७ लाख ३० हजार रुपयांचा पहिला हफ्ताही वितरित करण्याचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे.
कधी झाली होती सुतगिरणीची नोंदणी? - नॅशनल सहकारी सूतगिरणीची ७ डिसेंबर २०२० रोजी नोंदणी करण्यात आली होती. शासनाने १७ जून २०२१ रोजीच्या निर्णयान्वये सहकारी सूतगिरणीची प्रकल्प किंमत ८० कोटी ९० लाख निश्चित केली होती. त्यानुसार सूतगिरणीने महाराष्ट्र राज्य सहकारी वस्रोद्योग महासंघाकडून २५ हजार ५३६ चात्यांचा प्रकल्प अहवाल तयार करून घेतला. तर, ३० जून २०२२ रोजी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पत्रान्वये सूतगिरणीचा ८० कोटी ९० लाख इतक्या किंमतीचा प्रकल्प अहवाल शासनाकडे निर्णयासाठी सादर केला होता.
सत्तार यांची चलाखी आणि मोठे बक्षिस - सत्तार यांनी शिंदे यांना सत्ता स्थापनेसाठी मदत केली आणि बळही दिले. त्याबदल्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घालत सुतगिरणीला निधी देण्याची मागणी केली. त्याची दखल घेऊन ४ जुलै २०२२ रोजी शासनाने या सूतगिरणीची ५:४५:५० या आकृतिबंधानुसार अर्थसहाय्यासाठी निवड केली होती. सूतगिरणीच्या प्रकल्प किंमतीस मान्यता देण्याचे अधिकार वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीस आहेत. परंतु, अद्यापपर्यंत मंत्रीमंडळाचे खातेवाटप झालेले नाही. ही संधी साधत सत्तार यांनी तातडीने मोर्चेबांधणी केली व सूतगिरणीच्या किंमतीस मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी सदर फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने निर्णय घेत शुक्रवारी सत्तार यांना पहिले बक्षीसाच्या रूपाने सूतगिरणीच्या ८० कोटी ९० लाख रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
हेही वाचा - Uday Samant : 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेत हे स्वीकारलं पाहिजे'