मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणांमध्ये 23 फेब्रुवारीला चौकशी आयोगासमोर उपस्थित राहण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आला होता. मात्र त्यादिवशी आपल्याला चौकशी आयोगासमोर उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे आपल्याला साक्ष नोंदविण्यासाठी पुढची तारीख मिळण्याबाबतचे पत्र शरद पवार यांच्याकडून चौकशी आयोगाला देण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. शरद पवार हे काल चौकशी आयोगासमोर उपस्थित असल्याची माहिती समोर आली होती. मात्र शरद पवार यांनी चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी पुढची तारीख पत्राद्वारे मागितली असल्याचं यावेळी नवाब मलिक यांनी त्यांच्या राहत्या घरी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश
दोन वर्षानंतर कोरोनाबाबत दिलासादायक परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून जनतेच्या सहकार्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती यावेळी मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात जवळपास ८०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बहुतेक रुग्ण हे लक्षणे असलेले असले तरी ते होमक्वॉरंटाईन आहेत. मुंबईत डबल डिजिट आकडा आला आहे. ही सगळी परिस्थिती पहाता याबाबत पुढील काळात कोणते निर्देश द्यायचे हे आरोग्य विभाग आणि मदत व पुनर्वसन विभाग प्रस्ताव तयार करतील आणि मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील असेही नवाब मलिक म्हणाले.