मुंबई - 'सामना' दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. 'एक शरद, सगळे गारद' या नावाने घेतलेल्या मुलाखतीत शरद पवार यांना लॉकडाऊन, राजकारण, ठाकरे कुटुंबीय, महाविकास आघाडी सरकार यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले.
मुलाखतीदरम्यान राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली का, असा प्रश्न पवारांना विचारला. यावर त्यांनी होय असं उत्तर दिलं. बाळासाहेब स्वत: सत्तेत नव्हते. पण सत्तेमागील घटक होते. पहिले दोन महिने घरात स्वस्थ बसून होतो. त्यावेळी मला बाळासाहेबांची आठवण आली, असे पवार म्हणाले.
खरंतरं, बाळासाहेबांची कार्यपद्धती तुम्हाला माहीत आहे. शेवटच्या काळात अनेक दिवस त्यांनी घरात घालवले. त्यावेळी देखील सहकाऱ्यांना एकत्र घेऊन त्यांना प्रोत्साहीत कसं करायचं, हे बाळासाहेबांनी दाखवलं. मला प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळात बाळासाहेबांची आठवण आली, कारण आपण घराबाहेर न पडता भविष्यात ज्या दिशेने जायचंय, त्या प्रवासाची तयारी करायला हवी, ते बाळासाहेब करत होते; आणि त्यामुळेच मला बाळासाहेबांची आठवण आली, या शब्दांत शरद पवार यांनी बाळासाहेबांबद्दल भावना व्यक्त केल्या.