मुंबई - भगवान गडावरील दसरा मेळाव्यात बोलताना विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे, असा घरचा आहेर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजपला दिला होता. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याविषयी विचारले असता त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर भाष्य करायला त्या एवढ्या मोठ्या नाहीत असं म्हटलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर आज पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी मोठी नेता नाही, पवार साहेबांचे हे वक्तव्य बरोबर आहे. परंतु मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोलले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे. त्यांच्या बोलण्याने मी लहानही होत नाही व मोठीही होत नाही पण ते मोठे नेते आहेत यात वाद नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा - अजित पवारांच्या बहिणी 'जरंडेश्वर'मध्ये भागीदार; शरद पवारांना किरीट सोमैयांचे खुले आव्हान, म्हणाले..
पंकजा मुंडे यांनी आपल्या वक्तव्याने भाजपला दिलेला घरचा आहेर बघता यावर शरद पवार यांनी मिश्किल टिप्पणी जरी केली असली तरी या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते पत्रकार परिषद सोडून निघून गेले होते.
एकीकडे पंकजा मुंडे यांचे राज्यातील स्वपक्षीय नेत्यांशी संबंध ताणले जात असताना दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील योजना जनतेसाठी राबवाव्यात हे त्यांचे वक्तव्य बरेच काही सांगून जाते.