मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी घेऊन गेल्याने महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रीय काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ईडी आणि केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
आम्हाला खात्री होती
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पहाटे पाच वाजता ईडी कार्यालयात नेऊन चौकशी सुरू केली आहे. अचानक झालेल्या ईडीच्या कार्यवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावरून केंद्र सरकारला टीकेचे लक्ष्य बनवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ईडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. नवाब मलिक ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधात भूमिक मांडत होते, त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यवाहीची आम्हाला खात्री होती. परंतु, ईडीने आता कोणती केस काढली याबाबत माहिती नाही, असेही पवार म्हणाले.
...हा तर सत्तेचा गैरवापर
कोणत्याही प्रकरणाचा संबंध जोडायचा, नोटीस पाठवायची आणि चौकशीच्या नावाने लोकांना बदनाम करायचं, त्रास द्यायचा असे उद्योग महाराष्ट्र केंद्र सरकार कडून सुरू आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. केंद्र सरकार विरोधात उघड भूमिका मांडतात त्यांच्यावरच कारवाई होतेय, असेही पवार म्हणाले.