मुंबई - सत्ताधारी धर्माच्या नावाने दहशत निर्माण करत आहे. अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी बंधुभाव कायम राखण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मॉब लिंचींग सारखा शब्द यापूर्वी कधीही माहित नव्हता. परंतु, आता रोज या प्रकारच्या घटना समोर येत आहेत. यातून समाजात धार्मिक दहशत निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचा मेळावा राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी, भारतातील सर्वसामान्य माणूस आणि पाकिस्तानातील सर्वसामान्यांना भारत-पाकिस्तानमधील वैराबद्दल काही देणेघेणे नसल्याचे त्यांनी सांगितले. मी स्वतः तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आलो असून, ते लोक भारतीयांबद्दल बद्दल प्रचंड आपुलकीने वागत असल्याचा माझा अनुभव आहे, असे शरद पवार म्हणाले. अशीच भावना भारतीयांचीही आहे. परंतु, सत्ताधारी मात्र दोन्ही देशांमध्ये वैर निर्माण करून स्वत:चा राजकीय फायदा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यासाठी देशातील जनतेने सावध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. समाजातील काही विशिष्ट घटकांवर हल्ले केले जात असून, संबंधित आरोपींवर कोणतीही कारवाई होत नसल्याची खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.
हेही वाचाकार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पवार स्वत:च मैदानात, मंगळवारपासून करणार राज्यव्यापी दौरा
या मेळाव्यात शरद पवार यांनी कलम ३७० तसेच मॉब लिचिंग मुद्द्यांसह अनेक मुद्द्यांवर वक्तव्य केले. काश्मीरमधील 370 कलम काढले. परंतु, नागालँड आणि इतर सात राज्यातील हे कलम का काढण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. काश्मीरचा विशेषाधिकार काढून घेण्याला विरोध नाही. परंतु, लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे मत त्यांनी मांडले.
काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी पूर परिस्थिती अशा दुहेरी संकटात राज्यातील जनता आहे. अशा परिस्थितीत जनतेला आधार देण्याची जबाबदारी सरकारची होती. परंतु, मुख्यमंत्री एका तासासाठी सांगलीला आले; आणि यानंतर त्यांनी पुन्हा पाऊल ठेवले नसल्याचे पवारांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्वत: लातूरमधील भूकंपावेळी राज्याचे प्रमुख म्हणून सांभाळलेल्या जबाबदारीची माहिती दिली.
हेही वाचा गिरीश महाजनांचे जेवढं वय, तेवढा शरद पवारांचा राजकारणात अनुभव - रवींद्र पाटील
पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी सांप्रदायिक विचार कसे पसरवले जातील, यावर काम करत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच समाजामध्ये अशांती पसरवण्यासाठी काही प्रकाशन संस्था काम करत असून, सध्या एका वेगळया प्रकारच्या विचारधारेचा प्रसार केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.