मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी आज राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी अडीच वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक पार पडणार असून, या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पक्षातील काही जिल्हा निहाय नेमणुका आणि सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. राज्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यावर राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत याबाबतीत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकी आधी राष्ट्रवादीची बैठक : राज्यांमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर अद्यापही महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झालेली नाही. आज शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांची सर्वोच्च न्यायालयात घटनापिठाकडे सुनावणी होणार आहे. या सुनावणी कडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. 29 तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार पडलेल्या बैठकीत महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीबाबत देखील चर्चा होईल. तसेच पुढील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढाईचे किंवा स्वतंत्र लढायचे याबाबतीत देखील आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा होऊन त्यानुसार महाविकास आघाडीच्या होणाऱ्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका मांडणार आहे.