मुंबई - शरद पवार आणि भाजपचे आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत संयुक्त पॅनल उभे केले आहे. अशा वेळेस हिंदुत्व अथवा राजकारण आड येत नाही का? असा प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारला असता, केसरकर म्हणाले याबाबतीत हिंदुत्वाचा प्रश्न येत नाही. कारण खेळाला कोणतीही जात धर्म नसतो. खेळाडू हा खेळाडू असतो. त्यातही शरद पवार हे कधीही खेळात राजकारण आणत नाही. ते खेळाकडे त्याच दृष्टीने पाहतात हे त्यांचे मोठेपणा आहे. ते विविध खेळांच्या समित्यांवर राहिलेले आहेत. ते राजकारणासोबतच खेळातील ही भीष्म पितामह आहेत अशा शब्दांत केसरकर यांनी शरद पवार यांच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शेलार-पवार भेट - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवडून यावे यासाठी आशिष शेलार यांनी आज सोमवार (दि. 10 ऑक्टोबर)रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवार यांना शेलार यांनी मदतीचे आवाहन केले. तसेच, शरद पवार आणि शेलार यांनी मिळून संयुक्तपणे पॅनल या निवडणुकीत उभे केले आहे.
संयुक्त पॅनलच्या माध्यमातून निवडणुक - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपाध्यक्ष पदासाठी उपाध्यक्ष पदासाठी अमोल काळे सचिव पदासाठी अजिंक्य नाईक सहसचिव पदासाठी दीपक पाटील आणि खजिनदार पदासाठी अरमान मलिक निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. सदस्य पदासाठी जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, खोदादाद येजगिरी, गौरव पराडे, निलेश सामंत, दिपेन मिस्त्री असणार आहेत. तर मुंबई प्रीमियर लीग टी-ट्वेंटी साठी अध्यक्ष म्हणून विहंग सरनाईक आणि उपाध्यक्ष पदासाठी गणेश अय्यर यांना या संयुक्त पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे.