मुंबई : राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीच्या चौथा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असूनही शिवसेनेचा दुसरा आणि महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला हा मोठा झटका समजला जातोय. या पराभवबाबत चिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी वापराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अपक्षांच्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिलबरो निवासस्थानी पार पडली बैठक : आज सकाळी दहा वाजता शरद पवार यांनी आपल्या "दिलबरो" या निवासस्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवनिर्वाचित खासदार प्रफुल पटेल हे उपस्थित होते. विधान परिषदेच्या निवडणुकीआधी लवकरच तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठकीबाबतदेखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी : आगामी 20 जुलैला होणार्या विधान परिषद निवडणुकीमध्ये याची पुनरावृत्ती व्हायला नको. सर्वच नेत्यांनी याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. तसेच, राष्ट्रपती निवडणुकीसाठीदेखील सर्व नेत्यांनी तयार राहावे अशा सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीकडे अपक्ष आमदारांची मते असतानादेखील ती मते फुटली, यावर शरद पवार यांची नाराजी होती. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीआधी सोबत असलेले अपक्ष आमदारांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासंबंधीत तत्परतेने पावले उचलण्याच्या सूचना या बैठकीतून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांना माणसं विविध मार्गाने आपलीशी करण्यात यश आले : शरद पवार