मुंबई- हे गोवा नाही हे महाराष्ट्र आहे. काहीही खपवून घेणार नाही. बहुमत नसताना भाजपने सत्तास्थापन करून संसदीय पद्धतीच्या मार्गदर्शक तत्वांचा गैरवापर केला आहे. उद्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला सामोरं जाण्यासाठी आपण आता तयार असून त्यानंतर होणाऱ्या मतदानावेळी आपण १६२ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असलेले बहुमत सादर करून दाखवू, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकत्र येत हॉटेल ग्रँड हयात येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी आमदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अजित पवार यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्या व्यक्तीला पक्षातून काढून टाकले आहे त्याला पक्षाला आदेश देण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अजित पवारांना व्हिप काढण्याचा अधिकारही नसून त्यांचा व्हिप मान्य करण्याची आवश्यकता नाही.
नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करत ते पुढे म्हटले की, नवीन आमदारांनी निश्चिंत राहावे. ज्या आमदारांना आपले पद जाईल असा धोका वाटतो, त्यांनी काळजी करू नये. त्यांची जबाबदारी मी स्वत: घेतो. संसदीय लोकशाहीची हत्या होणार नाही याची काळजी महाराष्ट्र घेईल.
हॉटेल हयात येथे तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबरच घटकपक्षाच्या नेत्यांनीही एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनीही आघाडीच्या आमदारांना मार्गदर्शन केले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आमदारांसोबत हितगूज करत त्यांना धीर दिला. यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आमदारांना एकत्र राहण्याची शपथ दिली.