मुंबई- क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाल्याने अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. तब्बल २७ दिवसानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर शाहरुखच्या निवासस्थानी मन्नत बाहेर त्याच्या चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले.
मन्नतबाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा एकच जल्लोष पहायला दिसून आला आहे. चाहत्यांनी फटाके आणि पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर 'वेलकम होम प्रिंस आर्यन' असे पोस्टरदेखील लावले आहेत. आर्यनच्या जामिनानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी आर्यनच्या स्वागताची जंगी तयारी केल्याचे पहायला मिळत आहेत.
हेही वाचा-राज्य सरकार स्थापन करत असलेल्या SIT विरोधात समीर वानखेडेंची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
मन्नतबाहेर पोलिसांची फौज
मुंबईतील अनेक शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर मोठी गर्दी केली आहे. 'वेलकम आर्यन खान', 'लव्ह यू शाहरुख सर' अशा घोषणा देताना चाहते दिसत आहेत. मन्नत बाहेर आलेल्या शाहरुखच्या चाहत्यांची गर्दी रोखण्यासाठी मन्नतबाहेर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा-Cruise Drug Case : पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - नवाब मलिक
शाहरुखसह त्याच्या चाहत्यांना आर्यनच्या सुटकेची होती प्रतिक्षा
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून शाहरुखचे लाखो चाहते त्याच्या पाठिशी उभे राहिले होते. आर्यनला अटक केली तेव्हा शाहरुख 'पठाण' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होता. शाहरुख मुंबईत आल्यानंतर चाहत्यांनी 'वी सपोर्ट शाहरुख' 'वी सपोर्ट आर्यन खान', असे पोस्टर घेऊन त्याला समर्थन दिले होते. आर्यन खानच्या सुटकेची शाहरुखसह त्याचे चाहते वाट पाहत होते. मुंबईतील अनेक दर्ग्यांमध्येसुद्धा आर्यनच्या सुटकेसाठी चाहत्यांनी चादरी चढविल्या होत्या. मन्नत बाहेर अनेक चाहते शाहरुखचा फॅमिली फोटो घेऊन 'लव्ह यू शाहरुख सर' अशा घोषणा देत आहेत.
हेही वाचा-आर्यन खान प्रकरणी मीडिया ट्रायल; आम्हाला बोलायची गरज ठेवली नाही - सत्तार
आर्यन खानची 29 ऑक्टोबरला सुटका होण्याची शक्यता
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा या तिघांना जामीन दिला आहे. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी आता ‘मन्नतवर’ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन उद्या(29 ऑक्टोबर) तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे व ज्येष्ठ वकील देसाई हे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. तर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली.