मुंबई - कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालये लवकरच सुरू होणार आहेत. यासंबंधीची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. येत्या आठ दिवसात डिझास्टर मॅनेजमेंटची बैठक घेतली जाणार असून या बैठकीनंतर राज्यातील कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाचा आढावा घेऊन राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालये टप्प्याटप्प्याने अथवा अर्धी महाविद्यालये कशी सुरू केली जातील यासाठीचा निर्णय घेतला जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा - IND vs AUS : टीम इंडियाची घोषणा; रोहितचे पुनरागमन, नवदीप सैनीचे पदार्पण
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालये आणि त्यांचे अभ्यासक्रम राज्यातील परिस्थिती पाहून सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठ आयोगाने दिल्या होत्या. परंतु कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आतापर्यंत राज्यातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम सुरू आहेत. मात्र प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन्ही जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 450 पैकी 119 निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यातील सर्वाधिक निकाल महाविकास आघाडीच्या बाजुने आहेत. त्यामुळे भाजपची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकाल 18 तारखेला आहे, त्यानंतर चित्र कळेल, असेही ते म्हणाले.