मुंबई - देशभरात ५ जुलै २०२२ पासून ७५ दिवसांची ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर, स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र’ मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेची सांगता आज जुहू चौपाटी येथे करण्यात आली (Seashore cleaning campaign concluded). यावेळी ५ हजार किलो इतक्या मोठ्या प्रमाणात समुद्रातून वाहून आलेला कचरा गोळा करण्यात आला. यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह, पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी सहभाग घेतला.
राज्यपाल, केंद्रीय मंत्री सहभागी - याप्रसंगी उपस्थितितांशी संवाद साधताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सागराचे आणि सागरी किनाऱ्याचे मानवी जीवनात असणारे महत्त्व आणि एकंदरीत पर्यावरण संवर्धनाची गरज याबाबत मार्गदर्शन केले. तर केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना भारतातील महत्त्वाच्या ७५ समुद्रकिनाऱ्यांच्या ठिकाणी ७५ दिवस राबविण्यात आलेल्या मोहिमेचा सांगता समारंभ मुंबईतल्या जुहू चौपाटीवर आयोजित होत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे नमूद केले.
किनारपट्टी स्वच्छ्ता अभियान - केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या ७,५०० किलो मीटर लांबीच्या किनारपट्टीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत देशभरातील ७५ समुद्र किना-यांवर ही मोहीम ७५ दिवस राबविण्यात आली. या मोहिमेचा आजचा अखेरचा म्हणजेच ७५ वा दिवस होता. मुंबईच्या स्वच्छतेसाठी दिवस-रात्र कार्यरत असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील देशभरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आपला खारीचा वाटा उचलला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्वराज्यभूमी - गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-आक्सा, गोराई-मनोरी या ७ प्रमुख चौपाट्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.