मुंबई - एकीकडे मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच या पावसाचा मंत्रालयाला फटका बसला आहे. मंत्रालयातही सिलिंगवर पाणी झिरपल्याने सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान सिलिंगचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
मंत्रालयाच्या तळमजल्यावरच पोलीस नियंत्रण कक्ष आहे. या ठिकाणी सामान्य नागरिकांसह पोलिसांचा कायम राबता असतो. याच तळमजल्यावर अचानक हा भाग कोसळल्याने पोलिसांची धावाधाव झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी करून ताबडतोब कोसळलेल्या भागाचा ढीग रिकामा केला. या घटनेबाबत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही काहीही बोलण्यास नकार दिला.