मुंबई - राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार ( School Open on 13 June ) आहे. तर, 15 जून पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्या, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. ( School reopening date )
कोरोनाच्या सुचनाबद्दल भाजपाचा सवाल - जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होऊन चौथा सोमवार, 27 जून 2022 रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील (विदर्भ वगळता) शाळा सोमवार १३ तारखेपासून सुरू होत आहे. त्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शाळांना कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना कधी देणार असा सवाल भाजपाचे शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना विचारला आहे.
सूचनांचे काटेकोरपणे पालन करा - 13 ते 14 जून 2022 रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत 24 ते 25 जून 2022 रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येऊन 27 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे. शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले तसेच यापुढे देण्यात येणारे निर्देश / सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे/ पालकांचे कोविड-19 प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन/ उद्बोधन करण्यात यावे, असे निर्देशही मांढरे यांनी दिले आहेत.
तातडीने परिपत्रक काढावे - मागील वर्षी शेवटच्या सत्रात शाळा सुरू करताना शाळांना कोरोनाविषयक नियमावली जारी केली होती. परंतू आता शाळा सुरू होण्यास केवळ दोन दिवसांचा अवधी उरल्यावर सुद्धा शिक्षण विभागाकडून कोणतेही आदेश न आल्याने पालकांना कोरोनाविषयक कोणत्या सूचना द्याव्यात असा प्रश्न शाळांपुढे उभा आहे. शाळांच्या तासिका, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण किती असावे ? शाळांचे सॅनिटायझेशन, त्यासाठी लागणार निधी याबाबत शिक्षण विभागाने तातडीने परिपत्रक काढावे अशी मागणी अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.
शिक्षक संघटना आक्रमक - राज्यात 13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. पण कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे त्याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. पण शाळा बंद करणे चुकीचे असून योग्य ती काळजी घेऊन नियोजनानुसार राज्यातील शाळा सुरु केल्या जातील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच सध्या कोरोनाची वाढती रुग्णसंख्या निश्चितच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आम्हाला निश्चितच काही तरी निर्णय घ्यावे लागतील. सध्या शाळा सुरु करणे गरजेचे आहे, असे देखील त्यांनी सांगितले. मात्र, आता शाळा सुरू होण्यास केवळ दोन दिवसांचा अवधी उरल्यावर सुद्धा शिक्षण विभागाकडून कोणतेही आदेश न आल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहे.
हेही वाचा - Widow Remarriage : 'विधवा प्रथा बंदी'नंतर अजून एक पाऊल पुढे; विधवांनी पुनर्विवाह केल्यास 11 हजारांचे अनुदान