मुंबई - माजी गृह मंत्री अनिल देशमुख कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अटकेत आहेत. याच प्रकरणात अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पलांडे आणि कुंदन शिंदे यांनी मुंबई सत्र न्यायालयात विशेष पीएमएलए न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनवणी पूर्ण झाल्यानंतर आज मंगळवार (दि.07) रोजी या दोघांनी सादर केलेला जामीन अर्ज न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी फेटाळला.
पलांडे आणि शिंदे यांच्यावर अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. पलांडे आणि शिंदे यांना 25 जून 2021 ला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून हे दोघेही तुरुंगात आहेत. या दोघांकडून काही दिवसांपूर्वी जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर सरकारी वकील आणि दोन्ही आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर आज निकाल देताना सत्र न्यायालयाने या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
देशमुख कुटुंबीयांना तात्पुरता दिलासा
अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या मालकीच्या दोन मालमत्तांबाबत तुर्तास कोणतेही आदेश देऊ नयेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पीएमएलए न्यायिक प्राधिकरणाला दिले आहेत. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तेवरील जप्ती उठवण्यात यावी यासाठी आरती देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकाने भरलेले वाहन आढळले होते. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणाने वेगळे वळणही घेतले. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली. तर, 100 कोटींच्या वसुलींच्या आरोपानंतर परमबीर सिंग आणि अनिल देशमुख चौकशीच्या फेऱ्यात अडकले. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने पीएमएलएच्या विविध गुन्ह्याखाली अनिल देशमुख यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल केला. तसेच, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनाही ईडीकडून अटक करण्यात आली.
हेही वाचा - Maharashtra Corona Update : 1087 रुग्णांना डिस्चार्ज, 699 नवे रुग्ण तर 19 रुग्णांचा मृत्यू