मुंबई - राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा युवा मोर्चाने बुधवारी शिवसेना भवन वर फटकार मोर्चा काढला. शिवसेनेकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान झालेल्या हाणामारीवर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना 'शिव प्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, असा सज्जड इशारा भाजपाला दिला. शिवसेना आणि भाजपामध्ये यामुळे चांगलेच शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे.
शिवसेना भवन अस्मितेचे प्रतीक -
राऊत म्हणाले की, शिवसेना भवनावर हल्ला करण्याची कोणाची हिंमत नाही. एक टोळी आली होती, पण ती नक्की कशासाठी आली होती? त्याचा संबंध काय हे समजून घेतले पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. हुतात्मा स्मारक ज्या कारणासाठी आपण आपला स्वाभिमान म्हणून जगतो. त्याच अस्मितेचे प्रतीक शिवसेना भवन आहे. बाळासाहेब ठाकरे यांची वास्तु मराठी अस्मितेचे प्रतिक असलेली वास्तू आहे. त्याच्याभोवती चाल करण्याचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक आणि मराठी माणूस गप्प बसेल का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
'श्रद्धेच्या वास्तूवर आरोपझाल्यामुळे चौकशी व्हावी'
श्रद्धेच्या वास्तूवर आरोप झालेत, त्यामुळे चौकशी व्हावी. राम मंदिरासंदर्भात आरोप केले असे म्हणता, पण कोणी आरोप केले? तुम्हाला काही लिहिता वाचता येतं का? तुमचा काही शिक्षणाचा गंध आहे का? तुम्ही सामनामधील अग्रलेख नीट वाचा. आमचे प्रवक्ते काय म्हणालेत ते नीट ऐका. जे आरोप झाले त्याची चौकशी करावी. ते आरोप द्वेष बुद्धीने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असा अग्रलेखात म्हटले आहे. एखाद्याला यामुळे मिरच्या का झोंबल्या? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करताना भाजपाचा समाचार घेतला. मुळात जे आरोप झाले ते थेट भाजपावर झाले आहेत का.? हा घोटाळा भाजपाने केला आहे का? राम मंदिर तीर्थक्षेत्र ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. येथील सदस्य स्वतंत्र आहेत. त्यांच्यात भाजपाचे कार्यकर्ते आहेत का? नाही ना, मग ज्या श्रद्धेच्या वास्तू संदर्भात आरोप होत आहेत. त्या आरोपावर ट्रस्टकडे लोकांनी खुलासा मागितला तर तो काही गुन्हा झाला आहे का? असा प्रश्न राऊत यांनी विचारला. तसेच काल हल्ला करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा प्रसादा पुरताच मर्यादित राहू द्या. शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा राऊत यांनी भाजपाला देत, आमच्यासाठी हा विषय संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'आरक्षणाबाबत केंद्र सरकारला राष्ट्रीय धोरण ठरवावे लागेल'
आरक्षणाचा विषय नाजूक आरक्षण हा मुद्दा नाजूक आहे. प्रत्येक जात समूह आरक्षण मागत आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत केंद्र सरकारला राष्ट्रीय धोरण ठरवावे लागेल, असे राऊत यांनी सांगितले. खासदार संभाजी छत्रपति आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी या मताचे दोन्ही नेते आहेत, अशी चर्चा झाली पाहिजे. शेवटी चर्चेतून मार्ग सुट्टी शकतो, असे राऊत म्हणाले. दरम्यान, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील एनआयएच्या छापेमारीवर बोलण्यास त्यांनी नकार दिला.