मुंबई - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज या नव्या सरकारचे बहुमत चाचणी होणार आहे. यात विधानसभा अध्यक्ष देखील निवडले जातील. या सभागृहातील लढाईत नेमका विजय कोणाचा ? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. बंडखोर शिंदे- फडणवीस विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढाई सभागृहात पाहायला मिळणार आहे. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी 'महाराष्ट्राच्या मातीत मंबाजीचे नाहीतर तुकोबांचे अभंग तरले' अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
आगीशी खेळू नका - यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "सच्चे शिवसैनिक कोण याचा सर्टिफिकेट आम्हाला देवेंद्रजींकडून घ्यायची गरज नाही. सच्चे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आज उपमुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसावं लागलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाव आग आहे, या आगेसी खेळू नका".
आजही भाजपला शिवसेनेची मदत घ्यावी लागते - "आमदारांनी त्यांचा निर्णय घेतला असेल, तर तो निर्णय त्यांना लखलाभ. आजही भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी बनविलेले शिवसैनिक हे विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत बसवण्यासाठी लागतात. यातूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. 2019 मध्ये जेव्हा शिवसेना आपल्या हक्काची मागणी करत होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नाकारलं होत.
माझी माहिती कमी आहे - विधान भवनातील शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आलं आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, "विधिमंडळाच्या एकूणच कार्यभाराविषयी मला कमी माहिती आहे. विधिमंडळाचे नियम आणि कायदे वेगळे असतात. नक्कीच पक्षप्रमुखांशी बोलून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं पक्ष कार्यालय कधी सील होत नाही आज काय विशेष आहे मला माहित नाही.
तर सर्व बंडखोर आमदारांना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत गोव्यामधून मुंबईत आणण्यात आलं, याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, "या सर्व परिस्थितीवरून मला अनेक मोठ्या नेत्यांचे फोन आले आहे. इतर राज्यात नेत्यांचे फोन आले. त्यांनी विचारलं मुंबईमध्ये अतिरेकी हल्ला झाला आहे का ? एवढे सुरक्षा व्यवस्था काल होती. बंद खोलीमध्ये कोण शिवसैनिक आणि कोण शिवसैनिक नाही, अशी प्रमाणपत्र जर भाजप देत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. शिवसेनेचा हा भाग्योदय आहे, असे राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.