मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हिने महाराष्ट्राला आपली यशोदा माता म्हटल्याने शिवसेनेने आता आपला मोर्चा थेट भाजपकडे वळविला आहे. कंगना रणौतने आपले ट्विटर हँडल स्वतः वापरावे किंवा त्या पक्षाला देऊ नये, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
कंगना रणौतच्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, कुणीही कितीही मोठा असो महाराष्ट्राचा अपमान सहन केला जाणार नाही. माझे कुणाशी काही व्यक्तिगत काही भांडण नाही. पण महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही असो त्याचा मी विरोध करणारच, असेही राऊत यांनी ठामपणे सांगितले.
हेही वाचा-कंगणाचं थोबाड फोडण्याच्या वक्तव्यावर शिवसेना ठाम, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तुरुंगात जायला तयार
संजय राऊत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की आशिष शेलार यांनी आपली भूमिका जरा जोरात मांडली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कोणी आपत्तीजनक बोलत असेल ,तर तो फक्त शिवसेननेचा विषय नाही. तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि 11 कोटी जनतेचा आहे, अशा भाषेत त्यांनी शेलार यांना सुनावले आहे. हे आंदोलन फक्त शिवसेनेचे नाही, सर्वांचे आहे. शिवाजी महाराजांचा फोटो फक्त बॅनरवर लावण्यासाठी नाही , असा टोलाही त्यांनी शेलार यांना लगावला.
हेही वाचा-कंगनाचा सूर नरमला, म्हणे 'मुंबई हीच माझी कर्मभूमी तिच माझी यशोदा मैय्या'
अनेक लोकांनी महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाबाबत अभ्यास करणे गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा महाराजांबाबत आपत्तीजनक वक्तव्य होतील तेव्हा तेव्हा त्याचा सर्वांनी मिळून विरोध करणे गरजेचे आहे. त्यामुळे काल शिवसैनिकांनी कंगना रणावतचा निषेध केला. मात्र सेट वैगरे जळण्याची भाषा आम्ही केली नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. राज्याच्या गृहमंत्र्यांनी, परिवहनमंत्र्यांनी ही कंगना रणौताबाबत भूमिका मांडली. मुख्यमंत्री, गृहमंत्री फक्त कोणा एका पक्षाचे नाही तर ते महाराष्ट्राचे आहेत. आता हा विषय संपवला पाहिजे, कुणाच्या विरोधात काय कारवाई करायची ते सरकार बघून घेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.