मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांचा रखडलेला विषय त्यासोबतच विधान परिषदेच्या पाच जागांवर उद्या होत असलेल्या मतदानावर चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. या भेटीत झालेल्या चर्चेनंतर राऊत यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शरद पवार यांची आपण भेट घेतली असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक व उत्साह थक्क करणारा आहे. संकटे व असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित.
![संजय राऊत यांचे ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-pava-raout-7201153_30112020194012_3011f_02829_273.jpg)
राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा एकूण कारभार आणि त्याविषयीची शाश्वती व्यक्त केली आहे.
हेही वाचा-'शेतकरी आहेत म्हणून देश आहे; मोदींनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी..'
तिन्ही पक्षांकडून पदवीधर मतदारसंघ निवडणूक एकत्रित-
- राज्यात विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी निवडणूक एकत्रित लढली आहे.
- पुण्यामध्ये पदवीधरसाठी राष्ट्रवादीने तर शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे.
- औरंगाबाद पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीने जोर लावला आहे. त्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेनेही मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.
- अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत उमेदवाराला तिन्ही पक्षाचा पाठिंबा आहे.
- नागपूरमध्ये काँग्रेसने उभे केलेल्या पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला मोठे पाठबळ दिले आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मागील वीस दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यावर महाविकास आघाडीकडून कोणत्याही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. याविषयी लक्ष घालून लवकर तोडगा काढला जावा, अशी चर्चा या भेटीत झाली असल्याचे सांगण्यात येते.
![शरद पवार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-pava-raout-7201153_30112020194005_3011f_02829_533.jpg)
हेही वाचा-'शेतकऱ्यांना दिली जाणारी वागणूक दहशतवाद्यांसारखी'; संजय राऊतांची केंद्रावर टीका
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन महिन्यात आघाडी सरकार कोसळणार असल्याचा दावा केला होता. त्यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.