मुंबई - शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी सोमवारी पार पडली. यात शिंदे गटाचा विजय झाला. त्यानंतर सभागृहात झालेल्या भाषणांमध्ये अनेक बंडखोर आमदारांनी आपण बंडखोरी नेमकी का केली ? याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार भास्कर जाधव यांनी या आमदारांना भावनिक आवाहन करत पुन्हा मागे फिरण्यास सांगितलं. मात्र, या सर्वात एक नाव कॉमन होते ते म्हणजे खासदार संजय राऊत. त्यांच्यावर वारंवार टीका केली जात होती. यावर आता खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी मुंबईत निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत आपले मत व्यक्त केले ( sanjay raut responds to allegations ) आहे.
उद्धव ठाकरे काय दूध खुळे नाहीत - सोमवारी सभागृहात बोलताना बंडखोर आमदार गुलाबराव पाटील ( Rebel MLA Gulabrao Patil ) यांनी 'उद्धव साहेब तुमच्या बाजूला जे चार लोकांचे कोंडाळे आहे त्यांच्यापासून सावध रहा' असं म्हटलं होतं. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "त्या चार लोकांमुळे तुम्ही सत्तेत होतात आणि तुम्हाला मंत्री पदे मिळाली होती. हे जी तुम्ही चार लोक म्हणतात, ती सतत पक्षाचेच काम करत होती आणि आजही पक्षाचेच काम करत आहेत. मागची अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होतात. त्याआधी देखील पाच वर्षे तुम्ही सत्तेत होतात. त्यावेळेस सुद्धा तुमच्यासाठी काम करणारी हीच चार लोक होती. उद्धव ठाकरे काय दूध खुळे नाहीत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो." असं राऊत म्हणाले.
राणे, भुजबळ देखील हेच म्हणत होते - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहूमताची चाचणी जिंकल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या या भाषणावर बोलताना राऊत म्हणाले की, "मी दिल्लीला प्रवासात होतो. त्यामुळे त्यांचे भाषण मी काल पाहिलं नाही. आज सकाळी मी वर्तमानपत्रांमध्ये ते काय म्हणाले ते वाचले. मुख्यमंत्री जेव्हा बहुमत चाचणीचा ठराव जिंकतात त्यावेळी त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागते. यात त्यांनी राज्याची भूमिका न मांडता मी पक्ष का सोडला याची खुलासेच ते जास्त देत होते. नारायण राणे सोडून गेले, छगन भुजबळ सोडून गेले त्यावेळी त्यांचं भाषण देखील अशाच प्रकारचे होतं. पक्षाचा एखादा नेता जेव्हा पक्ष सोडतो, पक्षाशी प्रतारणा करतो त्यावेळी त्याला अशा प्रकारचे खुलासे द्यावे लागतात. लोकांना भावनिक आवाहन करणारी भाषणे त्यांना करावी लागतात. अशाच प्रकारचे भाषण काल झालेले मला दिसले." असे संजय राऊत म्हणाले.
100 हून अधिक जागा जिंकू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील आपल्या भाषणात 'कोणीही काळजी करू नका. आपण 200 हून अधिक आमदार निवडून आणू' असं वक्तव्य केलं होतं. "आनंदाची गोष्ट आहे. इतके आमदार निवडून आणायचे त्यांनी ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, असं यावर बोलताना राऊत म्हणाले. तसं तर आम्ही सुद्धा ठरवलंय पुढील निवडणुकीत शंभरहून अधिक जागा निवडून आणायच्या. कारण, आता आम्हाला देखील आमची ताकद कळलेली आहे. सध्या लोकांमध्ये जो काही उत्साह दिसतोय, जी काही प्रेरणा आणि चीड दिसते त्यावरून आम्हाला वाटतंय आम्ही शंभर होऊन अधिक जागा जिंकू अस वातावरण आज दिसतय."